माळेगाव : मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबिसीचे गेलेले आरक्षण व धनगर आरक्षणाबाबत प्रस्थापित पवार कुटुंबा विरोधात संघर्ष उभा केला जाईल, राज्य सरकारविरोधात तिव्र लढा उभारण्यात येईल, असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी माळेगाव येथे व्यक्त केला.
वाफगाव ते चौंडी दरम्यान सुरु केलेल्या पराक्रमी इतिहास जागर अहिल्येचा या यात्रेदरम्यान ते माळेगाव येथे रविवारी आले होते. यावेळी शरद संकुलात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे व माजी सरपंच जयदीप विलास तावरे यांनी गोपीचंद पडळकर यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य शासनाच्या धोरणावर टिका केली. आजपर्यत त्यांनी आरक्षणावर एक ही बैठक घेतली नाही. ज्या योजना आदिवासींना त्या धनगरांना मात्र या योजनेचा एक रुपया फंड दिला गेला नाही. दरम्यान प्रस्थापित पवार कुटुंबाच्या विरोधात आपण जो संघर्ष करत आहात या लढ्यात मी सामान्य शिपाई म्हणून तुमच्या सोबत आहे असे कार्यकर्त्यांना सांगितले. पवारांविरोधात मी ठाम भूमिका घेईन. या प्रस्थापितांच्या विरोधात जनजागृती करुन सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करु.