बारामतीत हवा पवारांचीच; पण नेमक्या कोणत्या...? महारोजगार मेळाव्यातील शिट्ट्या, टाळ्यांमुळे महायुती गोंधळात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 05:01 AM2024-03-03T05:01:06+5:302024-03-03T05:04:15+5:30
बारामतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळले होते. त्यावरून बरीच चर्चाही रंगली. परंतु कार्यक्रमाच्या २४ तास अगोदर शरद पवारांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकण्यात आले.
बारामती (जि. पुणे) : बारामतीत शनिवारी महायुतीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनासह ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक राजकीय खलबते होणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र संपूर्ण कार्यक्रमावर कोणीही टीकाटिप्पणी केली नाही; मात्र व्यासपीठावर शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर, तसेच त्यांच्या भाषणावेळी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी बारामतीकरांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला. त्यामुळे बारामती ही पवारांचीच असल्याचे सिद्ध झाले खरे; पण कोणत्या..? याचे मात्र गूढ कायम आहे.
बारामतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळले होते. त्यावरून बरीच चर्चाही रंगली. परंतु कार्यक्रमाच्या २४ तास अगोदर शरद पवारांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत टाकण्यात आले.
दोन्ही नेत्यांच्या आगमनावेळी जल्लोष
- शरद पवार यांनी व्यासपीठावर येण्यापूर्वी प्रवेशद्वारासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन करीत भेट घेतली.
- पवारांचे व्यासपीठावर आगमन होताच बारामतीकरांनी एकच जल्लोष केला. यावेळी पवारांनी हात उंचावत बारामतीकरांना अभिवादन केले.
- काही वेळानंतर शरद पवार यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात आले, तेव्हा बारामतीकरांनी शिट्ट्या, टाळ्या वाजवत जल्लोष केला. अजित पवार यांच्या भाषणाच्या वेळीदेखील ‘एकच वादा... अजितदादा’ या घोषणा देण्यात आल्या.
‘साहेबां’चा तो कागद फडणवीसांनी ठेवला खिशात
व्यासपीठावर शरद पवार यांनी फाइलमधून एक कागद काढत फडणवीसांना दिला आणि त्यावर दोघांनी चर्चा केली. त्यानंतर ‘स्माइल’ देत फडणवीसांनी तो कागद घडी घालून परत खिशात ठेवला. नेमका कशाचा असेल तो कागद? याची उत्सुकता सर्वांनाच लागली.
अजित पवारांपासून त्यांनी राखले अंतर
व्यासपीठावर शरद पवार यांचे आगमन झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला; पण अजित पवार यांच्याकडे पाहणेदेखील त्यांनी टाळले. सुळे यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नमस्कार करीत स्वागत केले; मात्र अजित पवार यांच्याकडे जाणे सुळे यांनीही टाळले. दीपप्रज्वलनासाठी पवार यांचे प्रमुख पाहुण्यांमध्ये नाव घेण्यात आले; पण त्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले.