लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “युवकांना चुकीचा राष्ट्रवाद शिकवला जातो आहे. विकासाचे राजकारण करणे अवघड असते, भेदभावाचे सहजपणे करता येते,” असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूडसाठी केलेल्या त्यागाचे मोल नक्की होईल, अशी आशा व्यक्त केली.
निमित्त होते संवाद पुणे यांनी आयोजित केलेल्या प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्सवाचे. या कार्यक्रमात मोहोळ व पवार यांची मुलाखत झाली. दोघांनाही परस्परांची प्रशंसा करतानाच राजकीय टोलेबाजीही केली. बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात शुक्रवारी (दि.२२) सचिन इटकर यांनी दोघांशी संवाद साधला.
पवार म्हणाले की, देशात युवकांची मोठी शक्ती आहे. त्यांना चुकीचा राष्ट्रवाद शिकवला जातो. प्रबोधनकार ठाकरे यांनी भेदभावाला, अनिष्ट रुढींना विरोध केला. आता युवकांना भरकटवले जात असल्याचे दिसते. युवा शक्तीचा वापर कसा करायचा हे राजकीय पक्षांनी ठरवायला हवे.
मोहोळ म्हणाले की, कोथरूडची संधी गेली यावर नाराज झालो नाही, असे खोटे बोलणार नाही. नाराज झालो, मात्र प्रदेशाध्यक्ष लोकांमधून निवडून यावा अशी पक्षाची भूमिका होती. मी काम करत असलेल्या कोथरूड मतदारसंघाची त्यांनी निवड केली आणि त्याचा अभिमान बाळगायचा, असे मी ठरवले. त्यामुळे संधी मिळणार होती पण राज्यात सत्ता न आल्याने ती हुकली.
‘संवाद’चे सुनील महाजन यांनी स्वागत केले. सुधीर गाडगीळ, हरिष केंची, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक राहुल कलाटे, रघुनाथ कुचिक आदी यावेळी उपस्थित होते.
चौकट
नाराज नाही
“मुरलीधर मोहोळ बहुधा २०२२ च्या महापालिका निवडणुकीत कोथरूडची नाराजी दाखवतील,” असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला. त्यावर मोहोळ यांनी लगेचच ‘१९ जणांचे बोलता की काय’ असा प्रतिप्रश्न करत पक्षावर नाराज वगैरे काहीही नसल्याचे स्पष्ट केले.