सध्या संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरातच असून, कार्यालयीन कामे देखील घरातूनच सुरु आहे. दुसरीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे घरातील पंखे, एसी, कुलर, टीव्ही, संगणक किंवा लॅपटॉप आदी उपकरणांचा वापर वाढला आहे. पर्यायाने विजेचा वापरसुद्धा वाढला असून, यात पंखे, कुलर्स आदींचा वापर १८ ते २४ तास होत आहे. त्यामुळे या उपकरणांचा अनावश्यक वापर टाळावा व वीजवापराकडे लक्ष ठेवावे. यासाठी मीटरमधील ‘केडब्लूएच रिडींग’ची दररोज पाहणी करावी़ लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व पब्लिक सर्व्हिसेस वर्गवारीच्या ग्राहकांना संभाव्य वीजबिलाची पडताळणी ही महावितरण मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे़
कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक सोसायट्या किंवा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास ग्राहकांना सरासरी वीजबिल जाण्याची शक्यता आहे. मात्र ग्राहकांनी स्वत: रीडिंग पाठविल्यास योग्य वीजवापराचे वीजबिल देण्यात येईल किंवा पुढील महिन्यात रीडिंग घेऊन प्रत्यक्ष केलेल्या वीजवापराचे स्लॅब बेनिफिटसह वीजबिल देण्यात येईल. यामध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे़
--------------------------------