वैयक्तिक लाभाच्या विधानाकडे लक्ष द्या : वळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:59 IST2024-12-23T17:55:38+5:302024-12-23T17:59:43+5:30
ही योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवली जाऊ शकते, यासाठी सर्वांनी मिळून काम करा, अशा सूचना माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.

वैयक्तिक लाभाच्या विधानाकडे लक्ष द्या : वळसे-पाटील
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात पायाभूत सुविधांची कामे भरपूर झाली आहेत; पण वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे शासकीय यंत्रणा पाहत नाहीत. यातील पाणंद रस्ते योजना ही योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवली जाऊ शकते, यासाठी सर्वांनी मिळून काम करा, अशा सूचना माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.
आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घोडेगाव येथील पंचायत समिती हुतात्मा बाबू गेणू सभागृहात दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, कार्यकारी अभियंता एस. एम. बांगर, माजी सभापती सुभाष मोरमारे, संजय गवारी, नंदकुमार सोनावळे, माउली घोडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बांधकाम, पाणीपुरवठा, मंचर व घोडेगाव रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग, लघुपाटबंधारे, शिक्षण, मंचर नगरपरिषद, पशुसंवर्धन आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक पंधरा दिवसांत विभागनिहाय बैठक होईल. आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचा आढावा पुढील बैठकीत घेतला जाईल. यासाठी आश्वासन देताना व माहिती सांगताना जबाबदारीने सांगा, अशा सूचना वळसे-पाटील यांनी दिल्या. तसेच कातकरी, ठाकर, पारधी समाजाच्या कामांकडे विशेष लक्ष द्या, येणाऱ्या उन्हाळ्यात तलाव योजना राबवून बंधारे धरण यातील मोठ्या प्रमाणात वाळूची कामे घेतली जावीत, यातील माती शेतकऱ्यांना हवी असेल तर ती देण्याची व्यवस्था करावी. तसेच विविध विभागांचे शासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न कळवावेत, याचा पाठपुरावा करून ही कामे पूर्ण केली जातील. मंच ग्रामस्थांसाठी मंचर नगरपंचायत हद्दीत नव्याने दवाखाना करण्यासाठी प्रस्ताव तयार करा, यासाठीदेखील शासनाकडे प्रयत्न करू, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.