पुणे : शिक्षण, नोकरी, वेतन तसेच विचारांमध्ये तफावत असल्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांचे पटेनासे झाले. त्यामुळे केवळ तीन महिन्यांतच विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशानाच्या माध्यमातून या दोघांना घटस्फोट देण्यात आला. दोघांचे लग्न जुळविण्यासाठी धावाधाव करणाºयांनाच या घटस्फोटासाठी प्रयत्न करावे लागले.पती विनय (वय २४) व पत्नी सविता (वय २२) (दोघांची नावे बदललेली) या दोघांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच झाले होते. दोघांच्याही ओळखीतील एका मध्यस्थाने हे लग्न जुळवून आणले होते. विनय व सविताच्या राहणीमानामध्ये मोठे अंतर होते. सविताने उच्च शिक्षण घेतल्याने तिला चांगली नोकरीही होती. विनयची नोकरी तुटपुंज्या वेतनाची होती. मात्र, त्याची शेती चांगली असल्याने हे लग्न जुळविण्यात आले. सवितानेही लग्नास होकार दिला. तिच्या आईने विरोध करूनही लग्न लावण्यात आले. पण लग्नानंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. सुमारे तीन महिनेच दोघे एकत्र राहिले. त्यानंतर सविताने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.यापुढे एकत्र राहणे शक्य नसल्याने दोघांमार्फत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल करण्यात आला. प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी समुपदेशक अॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे हा दावा समुपदेशनासाठी पाठविला. गुंजाळ यांनी समुपदेशानाद्वारे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्या समुपदेशानाच्या बैठकीतच दोघांचे विचार मिळतेजुळते नसल्याने त्यांच्या निदर्शनास आले. ‘दोघांना एकत्र आणणे शक्य वाटत नव्हते. समुपदेशनावेळी मुलीच्या नातेवाईकांनी घटस्फोटासाठी काही रक्कम मिळण्याचा आग्रह धरला होता. पण मुलाने त्यास असमर्थता दर्शविली. अखेर केवळ लग्नात दिलेल्या वस्तू परत घेण्याच्या अटीवर हा दावा निकाली काढून घटस्फोट देण्यात आला,’ असे गुंजाळ यांनी सांगितले.
वेतन, विचारांचा तूट घटस्फोटापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 3:48 AM