पुणे : खडकवासला धरणासाठी आधीच जमिनी गेल्या आहेत. आता पुन्हा रिंगरोडसाठी जमिनी द्याव्या लागतील. परिणामी, आमच्या उदरनिर्वाहाचा, रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने आम्हाला आर्थिक मोबदला समान पद्धतीने, तसेच रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाला पाठवून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.
हवेली तालुक्यातील सांगरूण, मांडवी बुद्रुक, भगतवाडी आणि बहुली गावातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी मांडवी बुद्रुक येथे शेतकऱ्यांसोबत नुकतीच बैठक झाली. या वेळी हवेली तहसीलदार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता संदीप पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची नोंद घेतली.
---
बारा गावांतील २५ टक्के मोजणी पूर्ण
गेल्या महिन्याभरात १२ गावांची २५ टक्के मोजणी पूर्ण झाली आहे. लवकरच बाकी गावांची मोजणी पूर्ण करून, शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला हा भूसंपादन अधिकारी यांच्या मार्फत ठरवला जाईल आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठविला जाईल. संपूर्ण प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा मनोदय आहे, असे उपअभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.
---
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या...
* खडकवासला धरणासाठी आधीच जमिनी गेलेल्या.
* सर्वच बाधित शेतकऱ्यांना समान पद्धतीने आर्थिक मोबदला आणि रोजगार उपलब्ध व्हावा.
* रिंगरोडचे काम होणाऱ्या इतर तालुक्यातील गावांना मिळणारा. मोबदला आणि आम्हाला मिळणारा मोबदला यात फार मोठी तफावत असल्याने समान वाटप व्हावे.
* परिसराचा फार विकास नसल्याने जमिनीचा मोबदला कमी आहे. तो वाढवून मिळावा.
---
रिंगरोडमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांच्या शक्य होईल तेवढ्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सर्व मागण्या सादर करणार आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवून सहकार्य करावे.
- तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार, हवेली
---
सध्या ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ संपादित करणार आहे. त्या शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान झाल्यावरच जमीन संपादित करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. पण तत्पूर्वी जमिनीची मोजणी करून घेणे गरजेचे असते. जमिनीच्या मोजणीदरम्यान झाडे, विहिरी आणि घराचे मूल्यांकन करण्यात येते.
- संदीप पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
--------------------------------
रिंगरोडसाठी लागणाऱ्या गावातील जमिनीचा नकाशा