लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला ४२ हजारांच्या पुढे गेली असताना, रूग्णालयांत उपचाराची गरज असलेल्या रूग्णांना मात्र उपचारासाठी बेड (खाटा) मिळेनाशे झाले आहेत़ जेथे बेड उपलब्ध आहेत, तेथे प्रथम कमीत कमी पन्नास हजार रूपये अॅडव्हांस जमा करा, तरच रूग्णाला भरती करून उपचार सुरू करू असे उत्तर देण्यात येत आहे़
शहरातील शंभरहून अधिक खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के खाटा या कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पुणे महापालिकेने नुकतेच जारी केले आहेत़ तसेच शहरातील २४ मोठ्या खाजगी रूग्णालयांमध्ये स्वत:चे अधिकारी याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठीही नियुक्त केले आहेत़ पंरतु, आजही बेड राखीव असले तरी, संबंधित खाजगी रूग्णालयाकडून प्रथम पैसे भरा व औषधे तुमची तुम्ही आणा असेच खडसावून सांगितले जात आहे़ यामुळे सर्वसामान्य रूग्णांचे शहरात सध्या मोठे हाल सुरू असून, बेडविना वनवन फिरण्याची वेळ शहरात सद्यस्थितीला आली आहे़
------------------
चौकट १
अवाजवी दर आकारणीबाबत महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, महापालिकेने सर्व खाजगी रूग्णालयांना कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी शासकीय दरांमध्ये राखीव खाटा उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे़ तर काही रूग्णालये अॅडव्हांस रक्कम मागत असेल तर, अंतिम बिलाची तपासणी मात्र महापालिका करणार असल्याने, कोणाही रूग्णाच्या नातेवाईकाकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिकचे पैसे घेऊ दिले जाणार नाही़ तसेच महापालिकेने याकरिता प्रमुख खाजगी रूग्णालयांमध्ये २५ आॅडिटरही नियुक्त केल्याचे सांगण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे़
--------------
चौकट २
शासकीय दराला केराची टोपली
खाजगी रूग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करताना संबंधित रूगणालयांकडून दिवसाला आॅक्सिजनसह खाटेकरिता (बेड) ४ हजार रूपये, आयसीयू खाटेकरिता ७ हजार ५०० रूपये तर व्हेंटिलेटर खाटेकरिता ९ हजार रूपये दर आकरणे बंधनकारक आहे़ तसेच एका रूग्णाकडून दररोजकरिता रूग्णालय एका पीपीई किटचे ६०० रूपये एवढेच दर आकारू शकते़ मात्र आजमितीला शहरातील काही खाजगी रूग्णालय मनमानी दर लावून कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांची अक्षरश: लूट करीत आहेत़
----------------------
चौकट ३
मेडिक्लेम असेल तर डबल डोस
कोरोनाबाधित रूग्णाचा मेडिक्लेम (आरोग्य विमा) असेल तर खाजगी रूग्णालय शासकीय दराला पूर्णत: बाजूला सारून, जेवढ्याचा मेडिक्लेम आहे तेवढ्या मोबदल्यापर्यंत कसे पोहचता येईल हेच पाहत आहे़ विशेष म्हणजे दहा पंधरा दिवसांनी जेव्हा हा आकडा पाच-सहा लाखापर्यंत जातो, तेव्हा आता तुमच्या मेडिक्लेमची रक्कम संपत असून उर्वरित पैसे भरा अन्यथा रूग्णास दुसरीकडे हलवा असेही सांगितले जात आहे़
---------------------------
चौकट ४
कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये काही रूग्णांवर आम्ही उपचार केले़ परंतु, रूग्ण दगावल्यावर रूग्णांच्या नातेवाईकांनी पैसेच भरले नाहीत़ कोरोनाबाधित रूग्णाचा मृतदेह असाही आमच्या ताब्यात देणार नाहीत असे सांगून त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला़ परंतु, आम्ही संबंधित रूग्णाच्या नातेवाईकाकडून शासनाच्या दरानेच पैसे मागत होतो, तरीही त्यांनी न दिल्याच्या अनुभव असल्याने, सध्या आम्ही रूग्ण दाखल करताना अॅडव्हान्स रक्कम घेत असल्याचे एका खाजगी रूग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाºयाने सांगितले आहे़
-------------------------