पुणे : पार्ट टाइम जॉब करून चांगला परतावा मिळवा, असे सांगून मिळालेला नफा मागितल्यावर क्रेडिट पॉइंट पूर्ण नाहीत, असा बहाणा करून फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिक माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने व्यक्तीने संपर्क साधला. जॉबसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यावर टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले.
सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यानंतर वेगवेगळी करणे सांगून ७ लाख ४६ हजार रुपये गुंतवण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नसल्याने विचारणा केली असता तुमचे क्रेडिट पॉइंट पुरेसे नाहीत त्यासाठी आणखी ६ लाख रुपये भरण्यासाठी तगादा लावला. पैसे नसल्याचे सांगितल्यावर टेलिग्रामवर ठेवलेला प्रोफाइल फोटो मॉर्फ करून पाठवला. ‘तुम्ही पैसे भरले नाही तर आम्ही तुमचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू’ अशी धमकी दिली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.