पुणे: पतीच्या निधनानंतर मालमत्तेतील पतीचा हिस्सा, त्याच्याबरोबर आणखी दहा कोटी रुपये द्या, नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुरुंगात पाठवीन, अशी धमकी सुनेने ज्येष्ठ नागरिक असलेल्या सासूला दिली.
याप्रकरणी बाणेर येथील एका ६४ वर्षांच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सून व तिचे वडील सुनील जैन (वय ६३, रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, सुनील जैन हे फिर्यादी यांच्या सुनेचे वडील आहेत. फिर्यादी यांच्या मुलीला दोन फ्लॅट मिळाले होते. त्यातील एक फ्लॅट फिर्यादीच्या मुलाला दिला होता. त्यांचा मुलगा व सून तेथे राहत होते. ती हा फ्लॅट आमच्या नावावर करून दे, नाहीतर मी निघून जाईन, तुमच्यावर केस करेन, अशी धमकी देत होती. त्यामुळे फिर्यादीच्या मुलीने तो फ्लॅट आपल्या भावाच्या दोन मुलांच्या नावावर केला.
फिर्यादीच्या मुलाचे हृदयविकाराने २०२२ मध्ये निधन झाले आहे. त्यानंतर सुनेचे वडील सुनील जैन हे इतरांना घेऊन त्यांच्या घरी आले. फिर्यादीच्या मुलाचा हिस्सा देऊन त्याशिवाय १० कोटी रुपये द्या. नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही व तुझ्यावर व तुझ्या मुलावर केसेस टाकून जेलमध्ये पाठवीन, अशी धमकी दिली. त्यांच्या औध रोड येथील नातेवाइकांकडे जाऊन त्यांनाही पैसे दिले नाहीत तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांनी त्यांच्या सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले १८ लाख २० हजारांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने त्यांच्या संमतीशिवाय दिल्लीला घेऊन जाऊन अपहार केला. नातेवाइकांद्वारे त्यांना वारंवार धमक्या दिल्या. त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्याचा मानसिक धक्का बसून फिर्यादी आजारी पडल्या. त्यांनी हा प्रकार आता दुसऱ्या मुलाला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.