लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनावरील नियंत्रण महत्त्वाचे आहेच, पण त्यासाठी रोजगार बंद करत असाल तर मग संघटित, असंघटित कामगारांना त्यांचे पूर्ण वेतन द्या, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली.
कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांची भेट घेऊन संघाने याबाबतचे निवेदन दिले. मागील वर्षीच्या टाळेबंदीमुळे कामगार व उद्योगावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. हाॅटेल, पर्यटन, वाहतूक, स्वयं रोजगारातील कामगार व उद्योजक, घरेलू कामगार, बिडी कामगार यांची स्थिती दयनीय व हलाखीची झाली आहे. उद्योग बंद पडल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत.
त्यामुळे स्थलांतरीत कामगारांकरता निवासी व्यवस्था, रेशन, अन्न पाणी, औषध व्यवस्था, असंघटित कामगारांना ५ हजार रूपये मदतनिधी द्यावा, कोणालाही कामावरून कमी करू नये, इएसआय योजनेत कामगारांचे लसीकरण करावे असे संघाने निवेदनात म्हटले आहे. संघाचे पदाधिकारी अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उमेश विस्वाद, सचिन मेंगाळे यावेळी उपस्थित होते.