लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यात कृषीपंपांची ४५ हजार कोटी रूपयांची थकीत बिले होती. ती कमी केली. तेवढी तरी भरा, ती रक्कम गावाच्या विकासासाठीच खर्च करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम व आर. आर. आबा पाटील सुंदर गाव योजनेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम अल्पबचत भवन येथे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. ग्रामविकास विभाग व पुणे जिल्हा परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पवार म्हणाले की, मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल, याचा ध्यास सदस्य पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवा. निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्या. निवडणुकीसाठी फार प्रयत्न आणि नंतर काहीच काम नाही असे करू नका. अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केला तर त्याची गय केली जाणार नाही.
जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्क थकीत राहणार नाही याची काळजी घेऊ. राज्याच्याच उत्पन्नात १ लाख कोटी कमी आलेत, तरीही विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे पवार म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी आभार मानले. आमदार सुनील शेळके आणि पुरस्कार विजेत्या गावांचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.