पिंपरी : शहरातील पथविक्रेत्यांसाठी आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ६३ हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समितीसोबत बैठक झाली. खोराटे, सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक, शहर फेरीवाला समितीचे सदस्य काशीनाथ नखाते, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सीताराम बहुरे, अण्णा बोदडे, शीतल वाकडे, राजेश आगळे, अमित पंडित, समितीचे सदस्य प्रल्हाद कांबळे, राजेंद्र वाकचौरे, डॉ. सरोज अंबिके, बी.के. कांबळे आदी उपस्थित होते.
शहरामधील विविध भागांमध्ये जे फेरीवाले व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी त्याच भागांमध्ये हॉकर्स झोन किंवा फेरीवाले क्षेत्र निर्माण करण्याचे ठरविले आहे. यामध्ये प्रभागनिहाय फेरीवाला क्षेत्र ठरविले आहेत. ज्या भागात जास्त प्रमाणात रहदारीस अडथळा निर्माण होतो, अशा ठिकाणी प्राधान्याने हॉकर्स झोन निर्माण करून रस्ते व चौक मोकळे करणे गरजेचे होते. शहरातील ज्या फेरीवाल्यांमुळे रहदारीस अडचणी निर्माण होतात तसेच फुटपाथवरील फेरीवाल्यांवर वारंवार अतिक्रमण विभागामार्फत कारवाई होते, अशा फेरीवाल्यांना दिलासा मिळणार आहे.
प्रभागाचे नाव, हॉकर्स झोन संख्या, हॉकर्स क्षमता
अ क्षेत्रीय कार्यालय -०४- ९२
ब क्षेत्रीय कार्यालय -०६-३७०
क क्षेत्रीय कार्यालय-०८-१०५२
ड क्षेत्रीय कार्यालय-१२- ३४६
इ क्षेत्रीय कार्यालय-०८-२५७
फ क्षेत्रीय कार्यालय -०७-१०६०
ग क्षेत्रीय कार्यालय-१२-५७०
ह क्षेत्रीय कार्यालय-०६-४५७
हॉकर्स झोनमध्ये शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना समन्वयातून जागा वाटप करण्यात येईल. शहरातील फेरीवाल्यांसाठी जागेचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. महापालिकेला विशिष्ट जागा भाडे दिल्यानंतर फेरीवाल्याला त्या जागा वापरण्याचा अधिकार राहील.
- विजयकुमार सरनाईक, सहायक आयुक्त, महापालिका .