पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील हाउसिंग सोसायट्यांमधील मैला सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी-ईटीपी) कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी तसेच, एसटीपीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका खासगी एजन्सीची नेमणूक करणार आहे. त्याला शहरातील सोसायटी फेडरेशनकडून विरोध करण्यात आला होता. मात्र, त्या विरोधाला डावलून खासगी एजन्सीची नेमणूक करण्यावर महापालिका ठाम आहे. त्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे.
शहरात ३३७ मोठ्या हाउसिंग सोसायट्या आहेत. त्यातील २९६ सोसायट्यांत एसटीपी सुरू आहे. त्या सोसायट्यांकडून सुमारे २१.१२ एमएलडी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. उर्वरित सोसायट्यांत एसटीपी कार्यान्वित नाही. पुणे, नाशिक व इतर महापालिकेमार्फत एसटीपीवर देखरेख ठेवण्यासाठी खासगी एजन्सी नेमली जाणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील सर्व हाउसिंग सोसायट्यांना भेट देऊन मैला सांडपाणी शुद्धीकरण केंद्राची ती एजन्सी पाहणी करणार आहे. सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव व सभासदांना एसटीपीबाबत पुरेशी माहिती देऊन एसटीपीचे महत्त्व समजवणार आहे.
सोसायट्यांमध्ये ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम-
सर्व सोसायट्यांमध्ये ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम बसविण्यास मदत करणार आहे. वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी योग्य एजन्सी दिली जाणार आहे. वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी योग्य एजन्सी सुचवून त्यांच्या कामावर नियंत्रणही ठेवणार आहे. सर्व सोसायट्यांमधील एसटीपीसंदर्भातील निर्णय एजन्सी घेणार आहे. सर्व हाउसिंग सोसायट्यांतील एसटीपी सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर वाढेल, असे महापालिकेचे म्हणणे आहे.