सोमेश्वरनगर : करंजे (ता. बारामती) येथील करंजे विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बनावट सातबाराच्या आधारे जमीन दाखवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमेश्वर शाखेची ८० लाख ९५ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसाांनी ११ जणांना अटक केली आहे.याबाबत बँकेचे झोनल अधिकारी वसुली विभाग बारामती विठ्ठल भाऊसाहेब वाघ (रा. बारामती) यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली होती. २४ आॅगस्ट २०१६ ते १८ मे २०१७ या काळात वेळोवेळी पुणे जिल्हा बँकेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सचिन नारायण पाटोळे, संतोष भगवान पाटोळे (रा. करंजे), अमोल देविदास वाघमारे (रा. खांडज), अजय अरविंद शेंडकर, हर्षदा तुषार शेंडकर, रोहिणी अरविंद शेंडकर, अरविंद नामदेव शेंडकर आणि तुषार अरविंद शेंडकर (रा. सर्व शेंडकरवाडी, ता. बारामती) यांनी कर्जप्रकरणासाठी लागणारे सातबारा उतारे, इ करार तसेचइतर कागदपत्रे आणि तलाठ्याचे खोटे शिक्के तयार करून कर्जप्रकरणे संस्थेचे सचिव शंकर नरसिंग बारवकर (रा. लोणी भापकर) यांच्याकडे देऊन त्यांनीही याची शहानिशा न करता संगनमताने बँकेची फसवणूक केली असल्याची फिर्याद देण्यात आली होती. या नंतर चार महिन्यांनंतर आरोपींना अटक करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे.यामध्ये संतोष भगवान पाटोळे, सचिन नारायण पाटोळे, अमोल देविदास वाघमारे, अजय अरविंद शेंडकर, हर्षदा तुषार शेंडकर, अरविंद नामदेव शेंडकर, तुषार अरविंद शेंडकर, व शंकर नरसिह बारवकर यांना दि. २९ रोजी अटक केली. तर सोमेश्वरनगर येथील जिल्हा बँकेचे विकास अधिकारी दत्तात्रय विश्वनाथ होळकर यांना दि. ३० रोजी अटक करण्यात आली. या सर्वांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पीडीसी बँक फसवणूक; अकरा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 2:49 AM