जिल्हा बँक निवडणूक: बारामतीमुळेच भाजपच्या प्रदीप कंद यांचा विजय सुकर झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:33 PM2022-01-04T16:33:00+5:302022-01-04T16:36:44+5:30

अनेक वर्षे बँकेवर वर्चस्व असलेल्या तिन्ही मंत्री संचालकाच्या तालुक्यातच कंद यांनी अनपेक्षितपणे मुसंडी घेत विजय संपादन केला

pdcc bank election pradip kand ajit pawar dattatray bharne dilip walse patil indapur ambegaon | जिल्हा बँक निवडणूक: बारामतीमुळेच भाजपच्या प्रदीप कंद यांचा विजय सुकर झाला

जिल्हा बँक निवडणूक: बारामतीमुळेच भाजपच्या प्रदीप कंद यांचा विजय सुकर झाला

Next

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार (ajit pawar) यांना जोरदार धक्का देत पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत क वर्ग मतदार संघातून भाजपचे उमेदवार प्रदीप कंद (bjp pradip kand) यांनी चांगली मुसंडी मारत विजयश्री खेचून आणला. अजित पवार यांच्याच बारामती तालुक्यात प्रदीप कंद यांना 52 मते मिळाल्याने विजय सुकर झाला. तर गेले अनेक वर्षे बँकेवर वर्चस्व असलेल्या तिन्ही मंत्री संचालकाच्या तालुक्यातच कंद यांनी अनपेक्षितपणे मुसंडी घेत विजय संपादन केला. कंद यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेत भाजपने एन्ट्री केली. 

जिल्ह्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा बँकेची निवडणूक यंदा भाजपच्या वतीने स्वतंत्र पॅनल उभे केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली होती. दरम्यान काही तडजोडी करून 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध करण्यात आल्या. यामुळे 7 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये जिल्हा बँकेची निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची करत बँकेच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचार मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांना उद्देशून गद्दारांना त्याची जागा दाखवून द्या असे जाहीर आवाहन केले होते. यामुळेच मंगळवार (दि.4) रोजी जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्यांचे लक्ष लागले होते.

यामध्ये क वर्ग मतदार संघातून भाजपचे प्रदीप कंद यांनी 405 मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव केला. यामध्ये अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात प्रचार न करता देखील प्रदीप कंद यांना तब्बल 52 मते मिळाली. तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांच्या आंबेगाव तालुक्यात व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांच्या इंदापूर तालुक्यात देखील कंद यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारा पेक्षा अधिक मते मिळाली. यामुळेच कंद यांचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान भाजपच्या नेत्या अशा बुचके यांच्या जुन्नर तालुक्याने कंद यांना उचलून घेतले. तर भाजपचे वर्चस्व असलेल्या मावळ आणि हवेली तालुक्यात कंद यांना तुलनेत कमी मते मिळाली.

Web Title: pdcc bank election pradip kand ajit pawar dattatray bharne dilip walse patil indapur ambegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.