पुणे जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांसाठी ५०० कोेटी रुपयांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:20 PM2018-02-14T15:20:35+5:302018-02-14T15:34:25+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पुणे जिल्हा सहकारी बँकेद्वारे पाच लाखांचे कॅशक्रेडिट दिले जाणार आहे. शिक्षकांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांना कॅशक्रेडिटचा फायदा मिळू शकणार आहे.
बारामती : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पुणे जिल्हा सहकारी बँकेद्वारे पाच लाखांचे कॅशक्रेडिट दिले जाणार आहे. शिक्षकांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांना कॅशक्रेडिटचा फायदा मिळू शकणार आहे.
प्राथमिक शिक्षकांना जिल्हा बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या पाच लाखांचे कॅशक्रेडिटबाबत निर्णय घेतल्याचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने २१ जानेवारीला पुण्यामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षक परिषदेत प्राथमिक शिक्षकांना पाच लाखांचे कॅशक्रेडिट पुणे जिल्हा बँकेच्या वतीने मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व रमेश थोरात यांनी ही मागणी पूर्ण करू, असा शब्द दिला होता. सोमवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत शिक्षकांच्या मागणीस अनुसरून प्रति शिक्षक पाच लाखांचे कॅशक्रेडिट देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे थोरात यांनी सांगितले. जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने अजित पवार व रमेश थोरात यांचा सत्कार केला. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, राजेंद्र जगताप, ज्ञानेश्वर पुंडे, सुरेश सातपुते, संतोष पानसरे उपस्थित होते.