लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एडविन फलेरो, विकी पुजारी, क्रिश उन्नीथन, रेयान सचिन यांनी टायब्रेकरमध्ये नोंदविलेल्या गोलमुळे पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) मुलांच्या संघाने कोल्हापूर संघाचा टायब्रेकरमध्ये ४-३ गोलने संघर्षपूर्ण पराभव करून ऊर्जा करंडकावर आपले नाव कोरले. पूर्ण वेळेत हा सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस(सीएपीएफ) यांच्या वतीने मुंबई येथील कुपरेज फुटबॉल मैदानावर झालेल्या या अंतिम लढतीत सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. २०व्या मिनिटाला अल्फ्रेड नेगलने अफलातून चाल रचत कोल्हापूर संघाच्या गोलकक्षात मुसंडी मारली. पण कोल्हापूरच्या बचाव फळीने गोल होऊ न देण्याची खबरदारी घेतली. त्यानंतर पीडीएफएच्या एडविन फलेरो, गुलशर अन्सारी, नीलेश परदेशी यांनी लागोपाठ तीन चाली रचल्या, पण कोल्हापूरच्या गोलरक्षकाने त्या यशस्वी होऊ दिल्या नाहीत. पूर्वार्धात त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात कोल्हापूरच्या आघाडीच्या फळीने जोरदार चढायांना प्रारंभ केला. ५७व्या मिनिटाला शिवाजी शिंदे, प्रदीप पाटील यांनी सुरेख चाली रचल्या, पण त्याचे त्यांना गोलात रूपांतर करण्यात अपयश आले. निर्धारित वेळेत सामना गोलशून्यबरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये पीडीएफए संघाकडून एडविन फलेरो, विकी पुजारी, क्रिश उन्नीथन, रेयान सचिन यांनी गोल केले, तर कोल्हापूरकडून शिवाजी शिंदे, प्रदीप पाटील, प्रणव माळी यांनी गोल केले. कोल्हापूरच्या ऋतुराज संकपाळ, नितांत कोरानी यांना गोल करण्यात अपयश आले.
पीडीएफए संघाला विजेतेपद
By admin | Published: May 11, 2017 4:35 AM