वाघापूर : दुष्काळ अन् पुरंदर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आहे. याही वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरीही अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही, तसेच हातात आलेले हक्काचे वाटाणा हे पीक बाजारभावाअभावी कवडीमोल दराने विकावे लागत आहे. तर, विहिरीमध्ये पाणीच नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठाही आता टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.कारण, या वर्षी एक-दोन नक्षत्रे वगळता बहुतेक सर्वच नक्षत्रांनी पावसाकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबरच व्यावसायिक, दुकानदार यांच्यावरही मोठा परिणाम झाला आहे. तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवडमध्येही शुकशुकाट पसरला आहे.शेतकºयांनी मोठ्या कष्टाने शेती पिकविली. ज्यांना पाणी आहे, त्यांनी ठिबकच्या साह्याने पिकांना पाणी दिले; परंतु त्या पिकांना सध्या बाजारभावही चांगला मिळत नाही. परिणामी, केलेला खर्चही निघतो की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. वाटाणा उत्पादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनपुरी, वाघापूर, गुरोळी, राजेवाडी, पारगाव, माळशिरस, पोंढे, नायगाव, पिसर्वे, सिंगापूर, राजुरी, रिसे-पिसे, आणि परिसरातील गावांमधील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.कमी पावसावर येणारे वाटणापीक आजही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, पावसाने ताण दिल्याने ते जळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी मजूर घेऊन भुईमूग, बाजरी, वाटाणा खुरपणी, तोडणी अशी कामे सुरू असून, अनेक ठिकाणी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांनी सायकल कोळपे हाती घेतले आहे. काही ठिकाणी कांदापिकासाठी आणि इतर पिकांसाठी वाफे तयार करणे, सरी ओढणे अशी कामे सुरू आहेत. मात्र, सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. सोनोरी, राजुरी या गावांमध्ये नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.पुरंदर उपसा योजना लवकरचकार्यान्वित होण्याची शेतकरी मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत. कारण, या माध्यामातून पिकांना जीवदान मिळाल्यास किमान दोन पैसे मिळवून खर्च तरी निघेल, अशी अपेक्षा आहे.पूर्व भागातील राजुरी आणि परिसरामध्ये जवळपास शेतकºयांनी पेरणीही केलेली नाही. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे पाऊस योग्य वेळी न झाल्यास विविध योजना सुरू करून त्या माध्यामतून पिकांना पाणी देण्याची मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
वाटाणा हातातून गेला; टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:05 AM