राजेश पांडे
संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासाला प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेचे धागे हजारो साहित्यिक, कलाकार आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने समृद्ध केले. या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचे माेठे कार्य १६ ते २४ डिसेंबर २०२३ या काळात पुण्यात होणार आहे. नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरचा पुणे पुस्तक महोत्सव १६ डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. ‘एनबीटी’ची भारतीय भाषांमधील शेकडो पुस्तके प्रदर्शनात असतीलच; याशिवाय महाराष्ट्रातील पुस्तक प्रकाशक त्यांच्या पुस्तकांना घेऊन पुण्यात येत आहेत. केवळ प्रदर्शनापुरता हा उपक्रम मर्यादित नसून सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, सृजनशीलतेला चालना देणारे, वाचनसंस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम, प्रख्यात लेखकांच्या मुलाखती अशा अनेक अंगांनी हा महोत्सव साजरा होत आहे. लोकसहभाग हे या महोत्सवाचे अंगभूत वेगळेपण आहे. अनेक शिक्षण संस्था, नागरी संघटना, स्थानिक स्वराज संस्था यांच्यासह खासगी क्षेत्र आणि हजारो नागरिक महोत्सवात सहभागी होत आहेत. पुणे पुस्तक महोत्सव महाराष्ट्राच्या साहित्य-सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवातील लोकसहभागासाठी आखलेल्या उपक्रमांचे स्वरूप अभिनव आहे. पुण्यात होत असलेल्या अभिनव उपक्रमांमध्ये ‘शांतता, पुणेकर वाचत आहेत,’ हा ऐतिहासिक ठरेल. १४ डिसेंबरला दुपारी बारा ते एक या वेळेत हा उपक्रम आहे. या दिवशी, तासभर सारे पुणे वाचणार आहे. जिथे असाल तिथे एक तास तुमच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करायचे, असे आवाहन पुणेकरांना केले आहे. ज्यांना अजून वाचता येत नाही अशा लहान मुलांना त्यांचे पालक त्याच दिवशी सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयात गोष्ट सांगतील. एकाच वेळी पाच हजार पालकांचा सहभाग यात असणार आहे. दुपारी एका तासात एकाच वेळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये -चौकांपासून कॅफेपर्यंत आणि शाळा-महाविद्यालयांपासून कार्यालयांपर्यंत, रिक्षा थांब्यापासून ते मेट्रो स्थानकांमध्ये अशा हजारो ठिकाणी लाखो पुणेकर वाचन करतील. जवळपास पाच हजार संस्था, संघटना आणि प्रभावशाली व्यक्ती या उपक्रमाच्या रूपाने एक विश्वविक्रम घडवतील.
पुण्यातील ऐतिहासिक, वारसा असलेल्या अशा तीस ठिकाणांहून १५ डिसेंबरला ज्ञानसरिता दिंड्या निघतील. महापुरुषांच्या आणि साहित्यिकांच्या विचारांची प्रेरणा या दिंड्या देतील. महाराष्ट्र, देश घडविणारी महान व्यक्तिमत्त्वे पुण्याने दिली. या व्यक्तिमत्त्वांची निवासस्थाने, कर्तृत्वाची ठिकाणे पुण्यात आहेत. दिंड्या या स्थानापासून सुरू होत, फर्ग्युसन कॉलेज येथे पोहोचतील.
हजारो पुस्तकांच्या साह्याने एक शब्द आणि जयतु भारत हे वाक्य ‘लिहिण्याचा’ उपक्रमही आयोजित केला आहे. पुणे पुस्तक महोत्सवात अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा आणि त्यातून वाचनसंस्कृती वाढीस लागावी, हा एकमेव हेतू या साऱ्या उपक्रमांमागे आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेने पुणे पुस्तक महोत्सवात नॅशनल बुक ट्रस्टच्या बरोबरीने भाग घेतला आहे. त्यामुळेच, हा महोत्सव एरव्हीच्या पुस्तक प्रदर्शनांपेक्षा वेगळा ठरतो आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील अनेक दिग्गज लेखकांना ऐकण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाच्या बरोबरीनेच महाराष्ट्राला पहिली ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ मिळण्याची शक्यता खूप आहे. या शक्यतेला वास्तवाची जाणीव करून देण्याचे काम महोत्सवातील लोकसहभागातून होईल, अशी अपेक्षा आहे. ‘युनेस्को’ दरवर्षी जगातील एका शहराची निवड ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ म्हणून करते. पुणे पुस्तक महोत्सव जागतिक राजधानीच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरणार आहे.