पुणे :पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी गुरुवारी ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणे शहरात विविध चौकांत, रिक्षाथांब्यांवर सरकारी-खासगी कार्यालये, महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला. या उपक्रमात तब्बल दोन लाख पुणेकरांनी सहभाग घेतला.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून वेळ काढत विधानसभेचे सभापती ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. अनेक जणांनी सोशल मीडियावर पुस्तक वाचतानाचे फोटो शेअर करीत पाठिंबा जाहीर केला.
वाचन संस्कृती संवर्धनासाठी ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालये, महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात पुणेकरांनी दुपारी १२ ते १ दरम्यान त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात साधारण ५०० जणांनी आवडीचे पुस्तक वाचत सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी, पत्रकार, राजकीय पक्षांचे नेते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिम्बायोसिस कुलपती डॉ.एस.बी.मुजुमदार, ‘बार्टी’चे महासंचालक डॉ. सुनील वारे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, ‘सरहद’चे संजय नहार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, अभिनेता प्रवीण तरडे, डॉ. मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी उपक्रमात सहभागी होत वाचन संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे, असे पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.