लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : मुळशी तालुक्यात काही ठिकाणी दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असताना याची झळ आता वन्यप्राण्यांना बसू लागली आहे. राष्ट्रीय पक्षी असलेले मोर आता पाण्यासाठी थेट नागरीवस्तीत येऊ लागले असून भरदिवसा त्यांचे दर्शन होत आहे. भूगावमधील माताळवाडी फाटा येथे याच प्रकारे भर सिमेंटच्या जंगलात, प्रमुख रस्त्यावर मोर आढळुन आला. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी वन विभागाला कळवले. वन विभागाने या मोराला दारवली येथील जंगलात सोडून दिले.जंगले उद्ध्वस्त करणे, खाणीसाठी डोंगराचे उत्खनन करणे, वाढत्या बांधकामांमुळे वनराईवर आक्रमण करणे आदी गोष्टींमुळे वनसंपत्ती नष्ट झाली. नैसर्गिक संपत्ती संपत चालली. जलस्रोत कमी झाले. पर्यावरण बिघडले. प्रदूषण वाढले आणि म्हणूनच वन्यप्राण्यांची घुसमट होत आहे. अशा परिस्थितीत तहान, भक्ष्य, निवारा यांच्या शोधार्थ त्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील महिन्यातच पौड येथे भर रस्त्यावर सांबर पिण्याच्या पाण्याच्या शोधात गावात आले होते. गावातील भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून मारून टाकले. वनविभागाकडून वनक्षेत्रात चारा-पाण्याची व्यवस्था केली जात नसल्याने वन्यप्राणी भरदिवसाही नागरी वस्तीत येऊ लागले आहेत, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.वन्य प्राण्यांच्या चाऱ्यासाठी वनविभागातील गवताच्या काड्या पेटवून दिला जात असल्याने चारा, पाणी, वृक्षांच्या बेसुमार कत्तलीमुळे या वनविभागातील वन्य पशुपक्ष्यांवर व वन्य प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. यातूनच वन्यप्राणी नागरीवस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. तालुक्यातील वनविभागाने चारा-पाण्याची सुविधा उपलब्ध केल्यास वन्य प्राण्यांची व वन्यपशुपक्ष्यांचे होणारे स्थलांतर थांबेल.- सचिन मिरघेसरपंच, आदर्श ग्रामपंचायत भूगाव
दोन घोट पाण्यासाठी मोर रस्त्यावर
By admin | Published: June 10, 2017 1:58 AM