लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतात दरवर्षीच्या तुलनेत भुईमुगाचे उत्पादन घटले आहे. तसेच जे भुईमूग उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा तेल उत्पादक व्यापाऱ्यांकडे शेंगदाणे विकण्याचा कल वाढत आहे. शेंगदाण्याची निर्यात देखील वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यातील आवक कमी झाल्याने शेंगदाण्याचे दर मागील आठ-दहा दिवसांत १० ते १२ रूपयांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगतिले.
पोहे, रवा, मैदा, चन्ना डाळ, बेसन आणि आटाचे भाव यापूर्वीच वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चांगला फटका बसत आहे. शेंगदाण्याचा हंगाम संपला आहे. मार्केट यार्डात आवक कमी होत चालली आहे. इतर वेळी दररोज ८ ते १० गाड्यांची होत होती. ती आता ५ ते ६ गाड्यांवर आली आहे.
कर्नाटक येथून सध्या पुण्यात आवक होत आहे. गुजरातमधून नगण्य आवक होत आहे. या वर्षी मुळातच शेंगदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात तेलाचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे तेल उत्पादकांना मोठ्या प्रमाणात शेंगदाण्याची विक्री उत्पादकांकडून केली जात आहे. तरीही नेहमीच्य तुलनेत शेंगदाण्याला कमी मागणी आहे. नवीन हंगाम सुरू होऊन मालाची बाजारात आवक वाढण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
श्रावण महिन्यातील उपवासामुळे सध्या साबुदाणाला मागणी वाढली आहे. त्यामुळे आठ दिवसात साबुदाणाच्या भावातही वाढ झाली आहे. घाऊक बाजारात साबुदाणा एकला आठ दिवसांपूर्वी किलोस ५२ रुपये भाव मिळत होता. तो आता ५४ रुपये झाला आहे. तर साबुदाणा २ आणि साबुदाणा ३ ला मागील आठवड्यात अनुक्रमे ४८ ते ५० आणि ४५ ते ४६ रुपये भाव मिळत होता. तो दोनला ५० ते ५२ आणि तीनला ४७ ते ४९ रुपये मिळत आहे.
--
घाऊक बाजारातील शेंगदाण्याचे भाव
शेंगदाण्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा भाव ४ सप्टेंबर रोजीचा भाव
घुंगरू ९०-९२ १०२-१०७
स्पॅनिश १००-१०२ १०७-११२
गुजराथ जाडा १०२ ११८