पुणे : पुण्यातल्या भरवस्तीत साेमवारी सकाळी माेर अाढळून अाल्याने अाश्चर्य व्यक्त करण्यात येत अाहे. पुण्यातल्या बुधवार पेठेतील एका पाच मजली इमारतीच्या छतावर माेर अाढळला असून स्थानिकांनी त्याला कात्रज सर्पाेद्यानाकडे सुपूर्त केले अाहे. एकीकडे पुण्यातल्या टेकड्यांवरील माेरांची संख्या कमी हाेत असताना भरवस्तीत माेर अाढळल्याने अाश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हा माेर तस्करीसाठी अाणला तर नाहीना असा प्रश्न देखील उपस्थित केला जात अाहे.
पुण्यातल्या गजबजलेल्या बुधवार पेठेतील तापकीर गल्लीतील एका इमारतीवर हा माेर अाढळला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या दाेन दिवसांपासून माेर या भागात पाहायला मिळत अाहे. येथील रहिवासी असलेल्या बाळासाहेब ढमाले यांना या माेराबाबत माहिती मिळताच त्यांनी त्याला पकडून पुण्यातील कात्रज सर्पाेद्यानाकडे सुपूर्त केले. ढमाले म्हणाले, गेल्या दाेन दिवसांपासून हा माेर येथे पाहायला मिळत अाहे. येथील स्थानिकांनी अाज मला या माेराबाबत माहिती दिली. मी अाज सकाळी 10.30 च्या सुमारास या माेराला ताब्यात घेऊन सर्पाेद्यानाकडे सुपूर्त केला अाहे. हा माेर भरवस्तीत अाला कसा याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.
पुण्याच्या चाैहाेबाजूंना टेकड्या अाहेत. या टेकड्यांवर माेरांबराेबरच अनेक वन्यजीव पाहायला मिळतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी माेरांच्या शिकारीच्या घटना समाेर अाल्या हाेत्या. माेराच्या पिसाला माेठी मागणी असते. त्यामुळे हा माेर तस्करीच्या हेतूने अाणला हाेता का अशी शंका उपस्थित करण्यात येत अाहे.