पुणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून व पुणे महापालिकेच्या देखभाल दुरूस्तीसह शहरातील ३० चौकात नुकतीच अत्याधुनिक एटीएमएस स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. आता लवकरच शहरातील ज्या चौकात एटीएमएस यंत्रणा नाही अशा ४० चौकांमध्ये पादचारी सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी एटीएमएस स्मार्ट सिग्नल बसविण्यात आले आहेत. शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालल्याने, आता वाहतूक सुधारणा करण्याबरोबरच पादचाऱ्यांच्या सोयीसाठीही महापालिकेने पाऊले उचचली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील ४० ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या कामांसाठी ३९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या कामासाठीही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात कामाला सुरूवातही करण्यात आली आहे. या कामामध्ये ट्रॅफिक सिग्नल साठी सहा मीटर उंच पोल उभे करणे, कॉपर, वायर साहित्य पुरवणे याचबरोबर ग्राफिकल टायमर बसविण्यात येणार आहे. या कामासाठी ३९ लाख ९० हजाराचे पुर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र या कामाची निविदा ही २० टक्के कमी दराने आली आहे. शहरातील विविध चौकात सिग्नल यंत्रणा आहे. पण त्यावर पादचारी सिग्नल यंत्रणा नाही. त्यामुळे शहरातील विविध भागातील ४० चौकांमध्ये पादचारी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पादचारी सिग्नल यंत्रणा बसणारे प्रमुख चौकगुडलक चौक, तुकाराम पादुका चौक, कोथरूड पीएमटी डेपो चौक, कर्नाटक हायस्कूल चौक, आशिष गार्डन चौक, चंद्रलोक हॉस्पिटल चौक, गंगाधाम चौक, शिवदर्शन चौक, केशवनगर चौक, ब्ल्यू डायमंड चाैक, लुल्लानगर आदी.