पुणे : माेठा गाजावाजा करत पुणे स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुण्यात स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना सुरु करण्यात आली. सुरुवातीला या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्याचे चित्र मात्र वेगळे आहे. या सायकलींचा शहरातील वापर जवळजवळ थांबला असून या याेजनेत सर्वप्रथम ज्या कंपनीने सायकली पुरवल्या हाेत्या त्या कंपनीने आता माघार घेतली आहे. पेडल या कंपनीच्या शहरातील सर्व सायकल मागे घेण्यात आल्या आहेत.
बाहेरच्या देशासारख्या साेयीसुविधा आपल्या देशात नाहीत अशी ओरड नेहमी केली जाते. परंतु तशा सुविधा आपल्या देशात दिल्यास त्या यशस्वी हाेण्याकरीता नागरिक सहभाग घेत नाहीत, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शेअर सायकल याेजना. वर्षभरापूर्वी ही याेजना शहरात सुरु केली. अगदी कमी पैशात आणि ऑनलाईन पद्धतीने या सायकल भाड्याने मिळू लागल्या. सुरुवातीला नागरिकांनी या सायकलींचा वापर केला. जस जशी सायकलींची आणि याेजनेत सहभागी सायकल कंपन्यांची संख्या वाढू लागली, या याेजनेला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. सायकली चाेरीला जाणे, त्यांची ताेडफाेड, कुठेही लावणे अशा अनेक तक्रारी समाेर आल्या. नागरिकांनी या सायकलींचा वापर कालांतराने कमी केल्याने सायकली या फुटपाथवर धूळखात पडून राहू लागल्या.
या याेजनेत सर्वप्रथम सहभाग घेतला हाेता, त्या पेडल कंपनीने आपल्या सर्व सायकल मागे घेतल्या आहेत. संपूर्ण भारतातूनच त्यांनी सायकल मागे घेतल्याचे त्यांच्या वेबसाईटवर सांगितले आहे. तर पालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन रस्त्याची कामे चालू असल्याने या सायकली मागे घेतल्याचे सांगत आहे. या याेजनेचा प्रतिसाद असाच कमी हाेत राहिला तर प्रशासन ही याेजना मागे घेणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.