पुणे : तीन दिवसांमध्ये स्पीड पोस्ट मिळणे अपेक्षित असताना पुण्यातून कोल्हापूरला तब्बल १३ दिवसांनी टपाल मिळाले. तसेच पुण्यातील पुण्यातदेखील सात दिवसांनी टपाल मिळाले. यावरून टपाल विभागाच्या स्पीड कमी झाल्याचे दिसून येत आहे. याविषयी टपाल कार्यालयात तक्रार करायला गेल्यानंतर त्यांनी ऑनलाइन तक्रार करा, असे सांगितले. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी स्पीड पोस्ट करायचे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
जलद टपाल मिळावा, म्हणून टपाल विभागाची स्पीड पोस्ट ही सेवा आहे. तीन दिवसांमध्ये कुठेही टपाल पाठविण्यात येते; परंतु, सध्या याविषयी अनेक तक्रारी दिसून येत आहेत. अनेक ग्राहक वैतागून तक्रारही करत नाहीत. परंतु, जे व्यावसायिक स्पीड पोस्टाने ग्राहकांना वस्तू पाठवतात, त्यांना याचा फटका बसत आहे.
अश्विनी यांचा छोटासा व्यवसाय असून, त्या ग्राहकांना वस्तू पाठवताना स्पीड पोस्टचा वापर करतात. गेल्या वर्षभरापासून त्या या सेवेचा वापर करत आहेत; परंतु सध्या त्यांच्या दोन ग्राहकांना स्पीड पोस्ट करूनही चौथ्या दिवशी टपाल मिळाले नाही. त्यानंतर आणखी दोन दिवस वाट पाहिली. तरीदेखील टपाल मिळाले नाही. डेक्कन टपाल कार्यालयातून टपाल पाठविले होते, तिथे जाऊन चौकशी केली असता, टपाल डिलिव्हर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधितांना टपाल मिळाले नव्हते. त्यानंतर कोल्हापूरमधील टपाल कार्यालयात जाऊन ग्राहकाने चौकशी केली, तिथेही पार्सल आले नसल्याचे सांगण्यात आले. अखेर अनेकदा चौकशी केल्यानंतर १३ दिवसांनी कोल्हापूरला ते पार्सल संबंधितांना मिळाले.
शहरातही स्पीड पोस्ट पाच दिवसांनी मिळाले
डेक्कन टपाल कार्यालयातून एक पार्सल वारजेला स्पीड पोस्ट केले हाेते. पाच दिवस होऊनही ते ग्राहकाला मिळाले नाही. त्यावर कार्यालयात चौकशी केली असता पार्सल डिलिव्हर झाल्याचे ऑनलाइन दिसले; पण संबंधितांना ते पार्सल मिळालेले नव्हते. एकूणच टपाल कार्यालयाच्या स्पीड पोस्टचा अनागोंदी कारभार यानिमित्ताने समोर आला. अनेकदा चौकशी केल्यावर अखेर सातव्या दिवशी वारजे येथे संबंधित ग्राहकाला टपाल मिळाले.
पार्सलवरील कोड निघाला तर अनेकदा टपाल मिळत नाही; पण ते ग्राहकाला मिळेल. पोस्टाच्या वेबसाइटवर तक्रार करा, त्यानंतर त्याची चौकशी होईल. आम्ही इथे काहीच करू शकत नाहीत.
- टपाल अधिकारी, डेक्कन पोस्ट ऑफिस, पुणे