पुणे : आपल्या विरोधकांची माहिती मिळविण्यासाठी इस्रायली तंत्रज्ञान असलेल्या पेगासस या सॉफ्टवेअरने सध्या जगभर धुराळा उडविला आहे. भारतातही विरोधकांच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर टाकून राजकीय नेत्यांपासून पत्रकारांपर्यंत अनेक लोकांची माहिती सरकारने गोळा केल्याचा वाद सध्या गाजत आहे. मात्र, पुण्यातील एका पतीने आपल्या पत्नीची माहिती मिळविण्यासाठी अशाच प्रकारचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोथरूड पोलीस सायबर तज्ज्ञांच्या मदतीने याचा छडा लावणार आहेत. याप्रकरणी कोथरूडमधील शिवतीर्थनगर येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षांच्या महिलेने कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनयभंग, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली बाणेर येथील ३७ वर्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर आणि कोथरूडमध्ये २३ डिसेंबर २०१३ पासून ५ मे २०१७ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पती-पत्नी आहेत. फिर्यादी यांच्याकडे त्यांचे पती वारंवार पैशांची मागणी करीत असत. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. पती फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. त्यावरून त्यांना शिवीगाळ व मारहाण करीत. फिर्यादी यांना त्यांच्या पतीने २०१३ मध्ये एक मोबाईल भेट दिला होता. या मोबाईलमध्ये स्पाय ॲप अँड रेकॉर्डर नावाचे ॲप अगोदर डाऊनलोड करून ठेवण्यात आले होते. या ॲपद्वारे त्यांची सर्व गोपनीय माहिती परस्पर आरोपी पतीने त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक लॅपटॉप व मोबाईलमध्ये घेऊन त्याचा गैरवापर केला. पती-पत्नी हे दोघेही आता वेगळे राहतात.
याबाबत कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडे यांनी सांगितले की, पती-पत्नीमधील हा वाद असून मोबाईलमधील सॉफ्टवेअरमार्फत गोपनीय माहिती काढून घेतल्याची पत्नीची फिर्याद आहे. याबाबत सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन याचा छडा लावण्यात येणार आहे.
.......
पेगासस काय आहे आणि कशाप्रकारे काम करतं?
पेगासस एक सर्व्हेलन्स सॉफ्टवेअर आहे. जे इस्रायलची सुरक्षा कंपनी एनएसओ ग्रुपने बनवलं आहे. हे सॉफ्टवेअर वापरून कोणत्याही व्यक्तीचा फोन हॅक केला जाऊ शकतो आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकतं. ज्या फोनला लक्ष्य करायचं आहे त्या फोनमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. एकदा का ते सॉफ्टवेअर कार्यान्वित झालं की, त्यामुळे फोनचा रिमोट ॲक्सेस मिळतो, म्हणजेच फोनच्या जवळ न जाताही त्यातले कॉल लॉग, कॉन्टॅक्ट, मेसेज यांच्यावर लक्ष ठेवता येतं.