पुणे : शहरातील विविध भागांत पारव्यांना धान्य टाकले जात असल्याने पारव्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले होते. पारव्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांकडून पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे या नियमाखाली हा दंड घेतला जात आहे.
शहरातील पारव्यांची वाढती संख्या आणि पारव्यांच्या विष्ठेपासून, तसेच पिसांमुळे दम्यासारखे आजार होत असल्याने नागरिकांनी पारव्यांना खाद्य टाकू नये, असे आवाहन महापालिकेने यापूर्वीच केले आहे. पारव्यांच्या या त्रासाची दखल घेत पालिकेचा आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आपली जबाबदारी झटकत होते. त्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश घनकचरा विभागाला दिला होता. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांची पथके तयार करून ज्या भागात पारव्यांना धान्य टाकले जाते, तेथे सकाळी आणि संध्याकाळी गस्त घातली जात आहे. पारव्यांना धान्य टाकण्यात येऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून पारव्यांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांची, तसेच त्रासाची माहिती नागरिकांना दिली जात आहे. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये पारव्यांना धान्य टाकले जात असलेल्या जागांचा शोध घेण्यात आला असून, तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी तेथे जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.