कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कापड बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. असे असताना काही व्यापारी मात्र बंद दाराआड व्यवसाय करीत असल्याचा प्रकार मागच्या काही दिवसांपासून घडत आहे. १० मे रोजी वाडा रोड येथील संगम कापड दुकान व शगुन कापड दुकान या दुकानांत शटर बंद करून मागच्या दाराने कापड विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्यासह पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. तेव्हा त्या ठिकाणी ग्राहक दुकानांमध्ये आढळले. यापूर्वी संगम नावाने सुरू असलेल्या या दुकान व्यावसायिकाकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच शगुन या दुकानदाराकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र यांनी पुन्हा कापड दुकाने सुरू ठेवली. इम्राण अशपाक मोमीन (वय ३८, रा. वाडा रोड मोमीन आळी, ता. खेड), अमित मनसुखला धाडीवाल (वय ३३, रा. वाडा रोड, ता. खेड) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नियम मोडून कापड विक्री करणाऱ्या दोन व्यावसायिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:10 AM