पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून वसूल करण्यात येणारा दंडही कॅशलेस पद्धतीने वसूल करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शहरातील वाहतूक पोलिसांना स्वाईप मशिन देण्यात आल्या असून, पिंपरी चौकात गुरुवारी सायंकाळी कॅशलेस दंडवसुली सुरू करण्यात आली. राज्य शासनाने पारदर्शक कारभारासाठी व्यवहार कॅशलेस पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कार्ड पेमेंटचा वापर केला जात आहे. दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडूनही स्वाईप मशिनद्वारे दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशिन देण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात प्रायोगिक तत्त्वावर या मशिनद्वारे दंड वसुलीची कारवाईला सुरुवात झाली आहे. सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, सीटबेल्ट न लावणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवाई केली जाते. नियमानुसार दंड आकारुन पावती दिली जाते. या दंडाची रक्कम रोख स्वरुपात घेतली जात होती. आता दंडाची रक्कम स्वाईप मशिनद्वारे घेतली जाणार आहे. एखाद्या वाहनचालकाकडे रोख रक्कम व कार्डही उपलब्ध नसल्यास त्या वाहनचालकाचा वाहन परवाना क्रमांक, वाहन क्रमांकासह इतर माहिती मशिनमध्ये फीड केली जाते. त्यानंतर वाहनचालकाच्या मोबाइलवर कारवाई केल्याबाबतचा मेसेज येतो. त्यामुळे कारवाई वेळी जरी वाहनचालकाकडे कार्ड अथवा रक्कम उपलब्ध नसल्यास वाहनचालक नंतर वाहतूक विभागात मेसेज दाखवून दंड जमा करु शकतो. (प्रतिनिधी)
‘स्वाईप’द्वारे दंडवसुली
By admin | Published: March 17, 2017 2:16 AM