बारामती : बारामती शहरातील वाढत्या बेशिस्त वाहतुकीवर आणि वाहतूककोंडीवर ‘लोकमत’ने मागील आठवड्यात प्रकाश टाकला होता. चार भागांत प्रसिद्ध केलेल्या या वृत्त मालिकेची गंभीर दखल घेत शहर पोलीस ठाण्याने १२ पोलीस कर्मचाऱ्यांद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम उघडली आहे. बेशिस्त वाहन चालकांवर होत असलेल्या कारवाईचे स्वागत करत शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले. बारामती शहरांतर्गत वाहतुकीची समस्या गंभीर आहे. दररोज शेकडो वाहने बारामती शहरात परिसरातील ग्रामीण भागातून दाखल होत असतात. मात्र, वाहतुकीचे सारे नियम पायदळी तुडवत काही महाभाग कोंडीमध्ये अधिकच भर टाकतात. यामध्ये रस्त्यावर वाहने उभी करणे, दुचाकींचे रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग करणे, तसेच पार्किंगच्या अपुऱ्या जागेमुळे आणि वाहनांच्या जास्त संख्येमुळे रस्त्यांवर वाहनांची कोंडी ही नित्याची बाब झाली होती. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आणि कामाच्या ताणामुळे पोलिसी कारवाई थंडावली होती. त्याचाच फायदा घेत शहरात बेशिस्त वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले होते. पदपथांवरील आक्रमणांमुळे पदचारीदेखील रस्त्यानेच चालतात. यामुळे छोटे-मोठे अपघातही सातत्याने होत आहेत. या अतिक्रमणांच्या विरोधात नगरपालिका ठोस पाऊले उचलत नसल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीच्या भीषण समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. शहरातील नागरिकांनी देखील याचे स्वागत केले. याची दखल घेत शहर पोलीस ठाण्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
बारामतीत बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
By admin | Published: June 01, 2015 5:23 AM