भोर : गडकिल्यावर पर्यटक करत असलेले उपद्रव आणि दाट धुके पाऊस वादळी वारा यामुळे दुर्घटना होत असल्याने भोर तालुका प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे.
मात्र, असे असताही कोरोना नियमांचे उल्लंघन करून रविवारी सुट्टी असल्याने अनेक पर्यटक भोर तालुक्यात आले होते. त्यात अनेक जण विमामास्क आल्यामुळे अशा १११ नागरिकांवर भोर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल करून त्यांना पुन्हा माघारी पाठवले.
वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्यावर काही पर्यटकांनी उपद्रव केल्याने वेल्हे प्रशासनाने राजगड व तोरणा किल्ल्यावर बंदी घातली होती. वाई आणि भोर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंजळगडावर फिरायला गेलेला दहा वर्षांचा मुलगा दाट धुक्यामुळे अंदाज न आल्याने पाय घसरून पडल्याने जखमी झाला होता. अशा घटना वारंवार घडत असल्याने त्या टाळण्यासाठी भोर तालुक्यातील रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ल्यावर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. रविवारी (दि.२०) खंडोबाचा माळ येथील नेकलेस पाँइट या शिवाय पावसाळ्यात धबधब्यावर भिजण्यासाठी आणि पर्यटनासाठी वरंध घाट, आंबाडखिंड घाट, भाटघर आणि नीरा देवघर धरणावरही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे भोर तालुका प्रशासनाने तालुक्यात किल्ल्यावर व पर्यटनस्थळांवर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. तरीही पर्यटक येत असल्याने भोर पोलिसांनी मास्क नसलेल्यांवर कारवाई करून परत पाठवले आहे. भोर तालुक्यात गड किल्ल्यावर निसर्ग पर्यटनास बंदी घातलण्यात आल्याने पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.