बारामती : राज्यातील शिक्षकांचे रखडलेले प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी तसेच वरिष्ठ व निवडश्रेणी आदेशातील दुरुस्ती होण्यासाठी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. १ जानेवारी २००४ नंतर नोकरीस लागलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगामध्ये पगारात अत्यल्प वाढ दिसत आहे, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांना उपशिक्षकांपेक्षा कमी आहे.सातव्या वेतन आयोगात ४३०० रुपये ग्रेड पे असलेल्यांना उपशिक्षकांपेक्षा मूळ वेतनात १०० रुपये कमी वेतन मिळत आहे. वेतन त्रुटी दुर करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती, जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली. पुणे शिक्षक संघाने वेतनत्रुटी दुरूस्ती प्रस्ताव के.पी.बक्षी यांच्या वेतन सुधारणा समितीकडे दाखल केला आहे. अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे, शिक्षण विभागाकडून प्रस्ताव सादर केल्यावर तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन प्रधान सचिव गद्रे यांनी दिले आहे. त्यामुळे शिक्षण विभागातून अर्थ विभागात प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली............सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटीसह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. ..........वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी नवीन आदेश...शिक्षक संघटनेच्या मागणीप्रमाणे वरिष्ठ व निवडश्रेणीच्या शासन निर्णयातील अटी शिथिल करून नवा शासन निर्णय प्रसिद्ध करीत असून या निर्णयाचा लाभ राज्यभरातील शिक्षकांना होईल.- आशिष शेलार, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य
शिक्षकांचे रखडलेले प्रश्न सुटणार : आशिष शेलार यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 2:18 PM