पुणे: राज्यातील वाढती बेरोजगारी हा सध्या ऐरणीचा प्रश्न आहे. अनेक तरुण बेरोजगारीस त्रस्त होऊन सध्या आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. २०१९ मध्ये ही जाहिरात प्रकाशित झाली असून, दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती. लाखो तरुणांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. पण जवळपास अडीच वर्षे पूर्ण झाले असून देखील अद्याप या पदाची परीक्षा झालेली नाही.
दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यशासनाने या संबंधित एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यानुसार राज्यस्तरीय निवड समिती मध्ये काही बदल केले आहेत. या समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत गुणाले यांची भेट घेऊन तातडीने प्रलंबित पद भरती पूर्ण करण्याबाबत निवेदन दिले.
गुणाले यांनी यावेळी सदर प्रकरण हे न्यायाल्याने दिलेल्या अरक्षणा बाबतच्या निकालानंतर विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. संबंधित विभागाचा अहवाल येताच तातडीने याबाबतची पूढील कार्यवाही पूर्ण करणार असून परीक्षा लवकरचं होतील अशी ग्वाही दिली.
यादव म्हणाले, जलसंपदा विभागाकडून २०१९ साली कनिष्ठ अभियंता गट ब (अराजपत्रित ) या संवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. एकूण ५०० पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९ होती. ही पद भरती तातडीने पूर्ण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणार असून गुणाले यांना विधी व न्याय विभागाचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेण्याबाबत देखील विनंती केली असल्याचे यादव यांनी सांगितले.