पुणे : मतदारराजाने उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदान करावे, यासाठी शहरातील व्यावसायिकांनी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. एकावर एक मिसळ फ्री, एकावर एक पिझ्झा फ्री, खाण्याच्या एकूण बिलावर १५ टक्के सवलत, १००० रुपयांच्या खरेदीवर २० टक्के सवलत अशा सवलतीचे मेसेज सोमवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.‘मतदान हे श्रेष्ठ दान आणि महत्त्वाचे कार्य आहे’, ‘मतदान केल्याची खूण दाखवा आणि एकावर एक मिसळ फ्री मिळवा’, ‘युवर व्होट काउंटस अँड मनी टू’, ‘प्रत्येक मत अमूल्य आहे, त्यामुळे मतदानाचा हक्क बजावा’ अशा प्रकारे संदेश सवलतींच्या फलकांवर देण्यात आले आहेत. मतदान आणि पुस्तक दिनाचे औचित्य साधून काही मान्यवर पुस्तकप्रेमींनी मतदारांना एक पुस्तक भेट देण्याचेही ठरविले आहे.गोखलेनगर परिसरातील आकांक्षा फाउंडेशननेही मतदानाच्या दिवशी अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. बोटावरील मतदान केल्याची शाई दाखवा आणि रक्तगट व मधुमेह तपासणी विनामूल्य करा, हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे फाउंडेशनच्या डॉ. अपर्णा गोसावी आणि डॉ. आकांक्षा गोसावी यांनी सांगितले.
मतदान करणाऱ्यांसाठी पुण्यात सवलतींची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 5:19 AM