पुणे : पुणे शहरात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढले. या दुर्घटनेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काही अजूनही बेपत्ता आहेत. पूर सदृश परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आले. या पूरग्रस्त भागाची पाहणी व नुकसान झालेल्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी आलेल्या राज्याचे महसूल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना नागरिकांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला.कार्यकर्त्यानी साखळी करून त्यांना नागरिकांच्या गर्दीतून बाहेर काढले.
शहरातील अरण्येश्वर , सहकारनगर, पर्वती, धायरी, वडगाव यांसारख्या भागात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.या दुर्घटनेत शहरात १४ बळी गेले असून काही जण बेपत्ता आहेत.गेल्या २ दिवसांपासून येथील नागरिक आपतकालीन संकटांशी संघर्ष करत आहे. पण पुणे महापालिकेच्या प्रशासनाकडून अपेक्षित मदत येथील पूरग्रस्त कुटुंबाना मिळालेली नाही. तसेच त्यांचे वीज प्रवाह आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले. मदत न देता फक्त फोटो काढायला आल्याचा आरोप पुरग्रस्त नागरिकांनी केला. तसेच भाजप सरकार , पुणे महापालिका आणि पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवणाऱ्या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर पाटील यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र ,नागरिकांनी कुठलाही प्रतिसाद न देता त्यांना विरोध केला.
या पुरात घर लोकांचे संसार उद्धवस्त झाले, अनेकांना कुटुंबातील व्यक्तींना गमवावे लागले. उपनगरातील सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे, पार्वती ते दहा फूट पाणी वाहत होते. यामध्ये ओढ्यासह अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने शेकडो वाहने वाहून गेले.