पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात महाविद्यालय परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीवर बहुतांशदा केवळ मर्जीतल्या प्राध्यापकांचीच वर्णी लावली जाते आहे. यामध्ये अनेकदा सेवाज्येष्ठता डावलून नवख्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्राध्यापकांना काम करायला लावले जात असल्याच्या तक्रारी त्यांनी ह्यलोकमतह्णकडे केल्या आहेत. विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, एमए, एमकॉम आदी शाखांतील विविध विषयांच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या विषयनिहाय प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीवर एक अध्यक्ष व ५ सदस्य अशा ६ सदस्यांची निवड करण्यात येते. त्या त्या विषयांच्या अभ्यास मंडळांचे अध्यक्ष व सदस्यांकडून ही निवड केली जाते. मात्र ही निवड अनेकदा पक्षपाती पध्दतीने केली जात असल्याचा प्राध्यापकांचा आरोप आहे. अर्थशास्त्राच्या पेपर सेटींग समितीमधील प्राध्यापकांनी गोपनीयतेचा भंग करून सोशल मिडीयावरून त्याचा डंका पिटल्याचे लोकमतने रविवारी उजेडात आणले. यापार्श्वभुमीवर अनेक प्राध्यापकांनी पुढे येत त्यांच्या असंतोषाला वाट करून दिली आहे.प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम ठरविणे, पेपर सेटींग समितीच्या सदस्यांची निवड करणे, विषयाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आदी महत्त्वाची कामे त्या विषयाच्या अभ्यास मंडळांकडून पार पाडली जातात. या अभ्यास मंडळावर निवडणुकीव्दारे व कुलगुरू नियुक्त अशा दोन पध्दतीने सदस्यांची निवड केली जाते. नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरू नियुक्त सदस्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यंदा अभ्यास मंडळावरील सदस्यांची नियुक्त सदस्यांची निवड करण्यास मोठा विलंब झाला, त्यानंतर गडबडीत या सदस्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या. गुणवत्तेच्या आधारावर या निवडी न झाल्याने प्रश्नपत्रिका काढण्याच्या समितीवर मर्जीतल्या प्राध्यापकांची निवड करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे.
...............
विभागप्रमुखांच्या पीएच.डीच्या विद्यार्थ्यांनाच संधीविद्यापीठ कॅम्पसमधील विभागप्रमुखांकडून अभ्यास मंडळ सदस्यपदी तसेच पेपर सेटींग समितीवर त्यांचे पीएच.डीचे विद्यार्थी असलेल्या सदस्यांचीच प्रामुख्याने वर्णी लावली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ प्राध्यापकांनावर नवख्यांच्या अध्यक्षतेखाली काम करावे लागत असल्याचे पुरावे त्यांच्याकडून सादर करण्यात आले आहेत. याबाबत तक्रार केली तर विभागप्रमुखांकडून त्रास दिला जाईल या भीतीने अनेकजण तक्रार करायला धजावत नाहीत. कुलगुरू, प्र-कुलगुरू यांनी याप्रकरणामध्ये सुमोटो लक्ष घालण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
................................
अभ्यास मंडळ सदस्य नियुक्ती गुणवत्तेच्या आधारावर व्हावीप्राध्यापकांमध्ये मोठयाप्रमाणात असंतोष निर्माण होण्यामागचे मूळ हे अभ्यास मंडळावरील सदस्यांच्या नियुक्तीमध्ये दडलेले आहे. इतर विद्यापीठांनी अभ्यास मंडळांवर सदस्यांची नियुक्त करण्यासाठी रितसर वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित करून अर्ज मागविले. त्यानंतर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, त्यांची गुणवत्ता तपासून या निवडी करण्यात आल्या. मात्र पुणे विद्यापीठात अशी प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. त्यातून अडचणी निर्माण झाल्या असल्याची भावना प्राध्यापकांनी व्यक्त केली.