----
लोणी काळभोर : माहिती आणि प्रसारण मंत्रायलय, प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्यच्या वतीने वोकल फॉल लोकल या चित्ररथाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण आणि आत्मभारत जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत एक चित्ररथ आज दुपारी पूर्व हवेलीतील लोणी काळभोर येथे आला. परंतु कलाकारांनी दिलेला संदेश ऐकण्यासाठी एकही प्रेक्षक नसल्याने अशा प्रकारच्या जनजागृतीचा उपयोग काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
सदर चित्ररथ आज शनिवार (२२ मे) रोजी दुपारी पूर्व हवेलीतील हडपसर येथे ४, तर मांजरी बुद्रुक येथे ३ ठिकाणी जनजागृती करून दुपारी २ - ३० वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथे ३ ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी जुन्या अंबरनाथ भाजी मंडई नजीक आला होता. पुणे येथील कलाछंद कलापथकाचे एक महिला व एक पुरुष या दोन कलाकारांनी गाणी, पोवाडे व लोकगीतांच्या माध्यमातून कोरोनापासून बचाव कसा करावा, होऊ नये, परंतु झाला तर घ्यावयाची काळजी याबरोबरच लसीकरणाविषयी प्रबोधन केले. परंतु शनिवार व रविवार या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन असल्याने तसेच दुपारी उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने कोणीही घराबाहेर पडले नाही. त्यामुळे या दोन्ही कलाकारांना नाईलाजाने विनाप्रेक्षक कार्यक्रम करावा लागला. शासनानेच दोन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. या दोन दिवसांत नागरिक घराबाहेर पडत नाहीत हे माहीत असतानाही चित्ररथाद्वारे आज तीन गावांत १० ठिकाणी जनजागृती करण्यात आली. तर रविवारी ( २३ मे ) रोजी हा चित्ररथ उरुळी कांचन परिसरात प्रबोधनाचे काम करणार आहे.
--
चौकट
--
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले असून, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले असून हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे तसेच थुंकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्य विभाग आणी युनिसेफच्या माध्यमातून या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना लसीकरणसंदर्भात गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी हे रथ तयार करण्यात आले आहेत. लोककलांच्या माध्यमातून हे चित्ररथ कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी समाजप्रबोधन करत आहेत.
--
फोटो क्रमांक : २२ लोणीकाळभोर जनजागृती चित्ररथ
फोटो - विनाप्रेक्षक करण्यात येत असलेले कोरोनाविषयक समाजप्रबोधन.