शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रत्यक्ष घटना स्थळी धाव घेत पिल्लांची शहानिशा केली तेव्हा ते उदमांजराची पिल्ले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु , तोपर्यंत बिबट्याच्या धसक्याने नागरिकांना घाम फुटला होता. याबाबत पिंपळे जगताप येथे काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तेथून जवळच सकाळी तांबेवस्ती येथे सोमनाथ सोंडेकर यांच्या शेतामध्ये ऊस कामगार ऊस तोडणीचे काम करत असताना त्यांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले आढळून आली. त्यांना पाहून कामगारांनी ऊसतोड बंद करून आरडाओरड करण्यास सुरवात केली. आम्ही पाहिलेली पिल्ले बिबट्याचीच असून बिबट्या पळून जात असल्याचा दावा ऊसतोड कामगारांनी केला. मात्र, त्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे, वनपाल सयाजी गायकवाड, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग सर्पमित्र गणेश टिळेकर, अतुल थोरवे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी पाहिलेली पिल्ले बिबट्याची नसून उदमांजराची असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले. तसेच यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे आजूबाजूला पाहणी केली असता कोठेही बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाही.त्यामुळे तेथील नागरिक आणि ऊसतोड कामगारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नागरिकांनी शेतात काम करताना मोठमोठ्याने आरडाओरड ,फटाके वाजवणे, किंवा वनविभागाला कळविण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यात बिबट्या समजून घेतला उदमांजराच्या पिल्लांचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 8:08 PM
तोपर्यंत.. बिबट्याच्या धसक्याने नागरिकांना घाम फुटला होता.
ठळक मुद्देआम्ही पाहिलेली पिल्ले बिबट्याचीच असून बिबट्या पळून जात असल्याचा दावा ऊसतोड कामगारांनी केला. वनविभागाच्या अधिकाºयांनी तेथे आजूबाजूला पाहणी केली असता कोठेही बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाही.