बारामती (पुणे) :बारामती विभागाअंतर्गत येणाऱ्या १५ पोलिस ठाण्यांमध्ये भेटी देऊन तेथील माहिती घेत कामाची सुरुवात करण्यात येईल. त्या भागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून लोकाभिमुख आणि स्मार्ट पोलिसिंग करणार असल्याचे बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. यापूर्वीचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. शुक्रवारी भोईटे यांनी बऱ्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालयात अप्पर पोलिस अधीक्षक जाधव यांच्याकडे कार्यभार सोपविला.
नवनियुक्त अप्पर पोलिस अधीक्षक जाधव यावेळी म्हणाले, कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, स्मार्ट पोलिसिंग करण्यासह गुन्हेगारी कमी करून महिलांविषयक गुन्हे घडणार नाहीत, याची काळजी आपण आपल्या कार्यकाळात घेऊ, अशी ग्वाही जाधव यांनी दिली. दरम्यान, संजय जाधव यांनी या अगोदर चंद्रपूर व श्रीरामपूर येथे गेली बारा वर्षे अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. चंद्रपूर येथे कार्यरत असताना नक्षली भागात विशेष कामगिरी बजावल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले होते. बदलीनंतर अप्पर पोलिस अधीक्षक भोईटे यांनी जन्मभूमीजवळ स्थानिक लाेकांना कायद्याच्या माध्यमातून न्याय देता आला, याचे मनस्वी समाधान आहे. अनेक जटील गुन्हे उघड करण्यासाठी टीमवर्कने काम केले. कार्यकाळात चांगल्या पोलिसिंगवर भर दिल्याचे भोइटे म्हणाले. दरम्यान, भोइटे यांनी यांची कारकिर्द गुन्हेगारी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.