- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : साहित्याच्या प्रचार, प्रसारासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या ११३ वर्षांपासून कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहे. गेल्या तीन वर्षात सुमारे २३०० साहित्यप्रेमींना आजीव सभासदत्व मिळाले आहे. संस्थात्मक शिस्त पाळली जावी, यासाठी सभासदत्वासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये तीन महिन्यांमध्ये आलेल्या अर्जांची छाननी करुन ते मंजूर केले जातात. गेल्या तीन वर्षात एकही अर्ज नाकारण्यात आलेला नाही. त्यामुळे परिषदेत नवोदित कवी, लेखक आणि वाचकांना स्थान दिले जात नसल्याच्या आरोप तथ्यहीन असल्याचे मसापकडून सांगण्यात आले आहे.महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना २७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत साहित्यव्यवहार जिवंत ठेवण्याचे काम संस्थेने केले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिषदेचे आजीव सदस्यत्व वर्षभरात केव्हाही स्वीकारता येऊ शकते. सध्या १६ हजारांहून अधिक साहित्यप्रेमी परिषदेचे आजीव सभासद आहेत, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहरांपुरता मर्यादित असलेला साहित्य व्यवहार ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा, यासाठी मसापकडून विभागीय संमेलन, शाखा मेळावे, शिवार साहित्य संमेलन, बांधावरची संमेलने असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. नवोदितांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. परिषदेचे हे उपक्रम सर्वसमावेशकतेचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया पदाधिका-यांकडून देण्यात आली.आजवर परिषदेच्या कार्यालयात येऊन अर्ज भरुन सभासदसत्वाची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. तीन वर्षांपासून अर्ज संकेतस्थळावरुन डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संस्थेकडून केवळ आजीव सभासदत्वासाठी केवळ १०० रुपयांचेच शुल्क आकारले जाते. संस्थेच्या मर्यादा, आर्थिक अडचणी यावर मात करत जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करुन घेतले जाते. गेल्या तीन वर्षांत संस्था जास्तीत जास्त तंत्रस्रेही होण्याचा प्रयत्न करत आहे, असेही जोशी यांनी सांगितले.-----------...पण दुषणे देणे अयोग्यगेल्या अनेक वर्षांमध्ये कोणीही यावे आणि सिनेमाचे तिकिट काढावे, अशा पध्दतीने सभासदत्व दिले जात होते. याबाबत निश्चित नियमावली करणे गरजेचे होते. नियमांचे पालन केलेल्या कोणत्याही साहित्यप्रेमीचा अर्ज आजवर नाकारण्यात आलेला नाही. साहित्यविश्वात नवीन संस्था स्थापन होणे, हे भाषेच्या विकासाचेच लक्षण आहे. मात्र, इतरांना दुषणे देऊन संस्था पुढे आणणे योग्य नाही.- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद................अशी आहे नियमावली :* आजीव सभासदत्वाचा अर्ज भरल्यानंतर मसापच्या दोन आजीव सभासद असलेल्या व्यक्तींची सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी घ्यावी.* अर्जाला छायाचित्र, पॅनकार्ड आणि आधारकार्डची स्वसाक्षांकित प्रत जोडावी.* हा अर्ज मसापच्या दर चार महिन्यांनी होणा-या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येईल.* कार्यकारी मंडळाने मान्यता दिल्यानंतर अर्जदाराला यासंदर्भातील माहिती कळवण्यात येईल. त्यानंतर मसापच्या कार्यालयात स्वत: येऊन आजीव सभासद वर्गणी भरुन रितसर पावती घ्यावी.* वर्गणी भरल्यानंतर सहा महिन्यांनी सभासदाला महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे त्रैमासिक मिळेल.
साहित्य परिषद लोकाभिमुख, तीन वर्षात वाढले तेवीसशे सभासद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 12:55 PM
साहित्याच्या प्रचार, प्रसारासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या ११३ वर्षांपासून कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहे.
ठळक मुद्देतीन वर्षांपासून अर्ज संकेतस्थळावरुन डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध संस्थेकडून केवळ आजीव सभासदत्वासाठी केवळ १०० रुपयांचेच शुल्क