लोकमत न्यूज नेटवर्कचिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायी असणाऱ्या पवना नदीचा श्वास गुदमरतोय. तिची होणारी दुरवस्था रोखण्यासाठी आता चिंचवडकर पुढे सरसावत आहे. यापुढे आपले कर्तव्य समजून नदीचे पावित्र्य राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नदीपात्रातील राडारोडा, प्लॅस्टिक, कचरा, जलपर्णी काढण्यासाठी लोकसहभाग मिळत आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून नदीचे प्रदूषण रोखल्यास पवनामाईचे बदलते रूप निश्चितच सुखदायी होईल ही भावना चिंचवडकरांच्या मनात रुजत आहे.शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची लांबी जवळपास २५ कि.मी आहे.२०० फूट पात्राची रुंदी असणारी ही नदी प्रदूषणा च्या विळाख्यात सापडली आहे. याबाबत वारंवार चर्चा होते. मात्र, नदीपात्रात टाकला जाणारा कचरा ही मुख्य समस्या आहे. याचाच विचार करून चिंचवडकरांनी पावनामाई स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणे सुरू केले आहे.‘संकल्प पवनामायी स्वच्छतेचा, उचलुया वाटा खारीचा’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्य सुरू केले ही आनंदाची बाब आहे.पर्यावरण रक्षण : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादथेरगाव पुलाजवळील सुमारे दीडशे ट्रक गाळ काढण्यात आला असून, नदी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. प्रत्येक चतुर्थीला पवना नदीची आरती केली जाते. या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. निर्माल्य, कचरा, प्लॅस्टिक नदी पात्रात टाकू नये यासाठी जनजागृती सुरू केली आहे. नदी पात्रालागत असणाऱ्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून प्रत्येक नागरिकाने एक झाड दत्तक घेऊन त्याची निगा राखावी यासाठी काम सुरू आहे.नियोजन महत्त्वाचेपवना नदीचे वाढते प्रदूषण हा चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, फक्त चर्चेतून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नदी पात्राची स्वच्छता करून रुंदी व खोली वाढविणे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काळेवाडी पुलाखाली नदी पात्रात असणारा राडारोडा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून नदीपात्राची साफसफाई करण्याचे नियोजन आहे.- राजेंद्र गावडे (नगरसेवक)नागरिकांचे सहकार्य हवेपवना नदीचे वाढते प्रदूषण हा महत्त्वाचा विषय आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती करून तिचे संरक्षण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, प्लॅस्टिक, निर्माल्य यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. निर्माल्य कुंडाचा वापर होणे महत्त्वाचे आहे. लोक सहभागातून नदीची साफसफाई करणे सुरू आहे. नागरिकांनी पुढे येणे ही खरी गरज आहे.- अश्विनी चिंचवडे (नगरसेविका)
प्रदूषण रोखण्यासाठी वाढतोय लोकसहभाग
By admin | Published: May 29, 2017 2:30 AM