पुणेकरांनो, सावधान! मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांची पुन्हा कडक कारवाई सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 06:11 PM2021-02-20T18:11:21+5:302021-02-20T18:12:34+5:30
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होऊ शकतो मोठा निर्णय..
पुणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून पुणे शहरामध्ये मास्क न वापणाऱ्यांवर कारवाई करायला महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच आणि हॉटेलमध्ये जाऊन मास्क न घालणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जातो आहे. आता कारवाईला सुरुवात झाली असली तरी या पुढे काही निर्बंध घालायचे का याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर उद्या होत असलेल्या बैठकीमध्ये घेण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये करुणा रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळाली आहे. चार टक्क्यांपर्यंत आलेला टेस्ट पॉझिटिव्हिटी रेशो आता दहा टक्क्यांपर्यंत आलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे यादृष्टीने आता काही निर्बंध नव्याने लागू केले जातात का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आज सकाळपासूनच संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मास्क परिधान न करणार्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली. पोलीस प्रशासन महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ास्क परिधान न करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र यानंतरही अनेक जण परिधान करत नसल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
लोकमत शी बोलताना कारवाई करणाऱ्या पथकातील एक अधिकारी म्हणाले ," वाढती संख्या लक्षात घेता आम्ही मास्क विरोधातील कारवाई संपूर्ण भागात करत आहोत. मात्र यानंतरही अनेक जण मास्क घालणे गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कारवाई दरम्यान आम्हाला अनेक लोक असेही भेटतात जी सांगतात कालचं मी दंड भरला पण तरीही त्यांनी घातलेला नसतो. त्यांना पुन्हा दंड केला तरी त्याचा किती उपयोग होईल असा प्रश्न आम्हाला यामुळे पडतो."
दरम्यान आणखी काही निर्बंध आणले जाऊ शकतात का याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले ,"आज पासून मास्क विरोधातील कारवाई ला सुरुवात झालेली आहे. याशिवाय काही निर्बंध लावायचे का याबाबत सर्वांच्या सूचना येतील त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर रविवारी ची बैठक होणार आहे त्यामध्ये निर्णय घेतला जाईल"