पुणे : राज्यासहित पुण्यातही कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला त्या दोन दिवसांत पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली होती. पण वीकेंड लॉकडाऊनला पुणेकरांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रमुख चौकातील पोलिसांशी संवाद साधला. त्या वेळी पुणेकरांनी अशीच साथ दिली, तर आपण सगळे मिळून कोरोनाला नकीच हरवू, असे सांगून सर्वानी नियमांचे या दोन दिवसांप्रमाणेच पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिक फक्त सकाळच्या वेळेतच जॉगिंगसाठी बाहेर येत आहेत. त्यांनी या काळात तरी घरात बसावे. आम्हाला कारवाई करण्याची वेळच आणून देऊ नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात मागील आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. एका दिवसात तब्ब्ल ६, ७ हजार रुग्ण आढळून येत होते. त्याच तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही कमी होते. पण गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत थोड्याफार प्रमाणात घट होत आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढत चालले आहे. २३ एप्रिलला ४ हजार ४६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर ५ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. काल दिवसभरात ३ हजार ९९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर ४ हजार ७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे पुणेकरांनी अशाच प्रकारे नियमांचे पालन करावे असे पोलीस सांगत आहेत.
सद्यस्थितीत प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आम्हाला पूर्वी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी लागत होती. आता विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांची विचारपूस करावी लागत आहे. आज मात्र रस्त्यावर नागरिक दिसून आले नाहीत. याचप्रमाणे दररोज नियमांचे पालन ते करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.