पुणे : वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी 4 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. याविषयी महापौर किशोरी पेडणेकरांवर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. ''लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे'', असे ते म्हणाले आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठकीत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पवार म्हणाले, ''महिलांचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मुंबईच्या महापौर या प्रथम नागरिक महिला हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले म्हणूनच त्यांनी तक्रार केली आहे. एसटी संपाच्या बाबतीत लोक काही वक्तव्य करत होते. लोकांनी आता बोलताना तारतम्य बाळगणे सोडले आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजातही तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. कोणीही असो लोकांसमोर व्यवस्थितच बोलता आले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते अथवा अजून कोणीही असो असे वक्तव्य करू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.''
महिला आयोगाने देखील अहवाल मागविला
मुंबईची महापौर ही एक महिला आहे. प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. असे असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा व समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. यामुळे शेलारांविरोधात पोलिसांत तक्रार करत असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी महिला आयोगाने देखील अहवाल मागविला आहे. काय केले होते वक्तव्य
बालकाच्या व वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईचेही सोमवारी निधन झाले. सिलिंडर स्फोटाची घटना ही 30 नोव्हेंबरला झाली होती. शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेत 'सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात' असे वक्तव्य केले होते. यावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे.