पुणे - राज्यात भाजप, मनसे या पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी भाजपा नेत्यांना काढला.
राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपा नेते सातत्याने आंदोलन करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात पुण्यात मंदिरात आरती करुन आंदोलन केले होते. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. ''करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री त्याचे कटाक्षाने पालन करत आाहेत. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या राज्यातील लोकांनी तारतम्य बाळगावे,'' असे म्हणत पवार यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला.
अन्नदात्याकडे सरकारचे दुर्लक्ष
शेतकरी गेल्या चौदा महिन्यांपासून घरदार सोडून, थंडी, ऊन, पाऊस कशाचाही विचार न करता आंदोलन करत आहेत. राज्यकर्ते संवेदनशील असतील, तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नोंद त्यांनी घ्यायला हवी होती, ही अपेक्षा व्यक्त करून पवार यांनी ‘दुर्दैवाने अन्नदात्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे,’ अशी टीका केली.
त्या यादीत राजू शेट्टींचे नाव
पवार म्हणाले की ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली. त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत. शेट्टी नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. त्यांनी कोणती भूमिका घेतली असेल, तर त्याबद्दल मला कल्पना नाही, असेही पवार म्हणाले.
विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा गैरवापर
अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील प्रश्नावरही पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. महाराष्ट्रातच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांतही ईडीचा गैरवापर सुरू आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. ईडीचा असा गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता.