सांगवी : समाजात फक्त स्वत:साठी जगणारी माणसं खूप आहेत. परंतु स्वत: जगत इतरांसाठी जगणारी माणसं खूप कमी सापडतात. सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी जीवनात संस्कार, शिक्षण आणि गुरू असतील तर नक्कीच संस्कारक्षम आणि मदत करणारी पिढी निर्माण होईल, असे मत रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त अधिकारी व्ही. डी. पाटील यांनी विद्यार्थी सस्नेह मेळाव्यात व्यक्त केले.
२४ वर्षांनंतरच्या जीवनातील प्रवासानंतर जुन्या आठवणी घेऊन कर्मवीर विद्यालय सांगवी (ता. बारामती) येथील सन १९९४ चे इयत्ता १०वीचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा पार पडला. शिक्षण घेत असताना उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षणाबरोबरच संस्थेचे संस्कार मिळाले म्हणून आम्ही उंच भरारी घेत जीवनात यशस्वी होऊन घडलो आहे, असे मत व्यक्त करत संस्थेच्या ऋणात राहता यावे म्हणून माजी विद्यार्थी यांनी संस्थेला मदत म्हणून ६१ हजार १११ रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच याच निधीतून संस्थेला आवश्यक साहित्य देण्याचे आश्वासन देण्यात आले. या वेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करुन भविष्यात नवीन शाळा परिसरात ८० झाडे लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. उपस्थित अनेकांनी जुन्या आठवणी काढल्या. या वेळी अनेकांना भावना अनावर झाल्या. तर काही जण जुने घडलेले घडलेले किस्से सांगून खळखळून हसत होते. काहींनी गाणी सादर केली, तर काहींनी भजन, कविता सादर केल्या. स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करून आलेल्या अनेकांनी पाणवलेल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. या वेळी सेवानिवृत्त शिक्षक नलावडे, शिवाजी तावरे, बनसोडे, दत्तात्रय गायकवाड, पर्यवेक्षक सुभाष लकडे उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन खलाटे यांनी, तर संतोष तावरे, अभिजित तावरे, सुषमा गाढवे, उमाकांत तावरे, नितीन कादबाने, दिनेश तावरे, शिल्पा तावरे, गौरी खलाटे, ऊर्मिला तावरे, विकास तावरे, संदीप घोरपडे, मारुती नाळे, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला धनंजय मदने, दीपक तावरे, चानी तावरे, बाळू जायपात्रे यांच्यासह ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन शिर्के यांनी केले. आभार नीलेश खलाटे आणि संदीप लोणकर यांनी मानले.