पुणे : सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.
‘भारतमुक्ती मोर्चा’च्या वतीने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत होते. मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रतिभा उबाळे, सचिन बनसोडे, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, बहुजन समाजाला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर इत्यादी अनेकांनी हे वैचारिक आंदोलन पुढे सुरू ठेवले. आपण आधुनिक विचारांचा पुरस्कार केला पाहिजे. पुरोगामी विचारांसाठी आमच्या सगळ्यांची साथ अखंड राहील.
वामन मेश्राम म्हणाले, सत्यशोधक समाजातून उभ्या राहिलेल्या आंदोलनातून संविधानाला सामाजिक आशय लाभला आहे. ही विचारधारा संविधानाने मान्य केली. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले. समता, बंधुता या तत्त्वांवर समाजाची पुनर्बांधणी आवश्यक आहे. देशात संसदीय लोकशाही आली आहे. पण ती खरी लोकशाही नाही. देशात सर्वसमावेशक लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत समता मूल्य प्रस्थापित होणार नाहीत. त्यासाठी सत्यशोधक आंदोलन पुन्हा नव्या जोमाने उभारावे लागेल.
बाबा आढाव म्हणाले, नव्या संसदेत खासदारांना राज्यघटनेची प्रत दिली. त्यात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता शब्द नाही. ही घोर लबाडी असून, त्यावरून दिशा ओळखा. पक्षामध्ये मतभेद आहेत; पण देश म्हणून एकत्र या.’
लक्ष्मण माने म्हणाले, सत्यशोधक समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे. त्यासाठी पुन्हा आंदोलन उभे करण्यात येईल. शरद पवार आणि वामन मेश्राम यांनी एकत्र येऊन राज्य व देशासाठी काहीतरी केले पाहिजे. पुन्हा वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊ द्यायचे नाही. ब्राह्मणेत्तर एकही मत भाजपकडे जाता कामा नये.