बारामती : अलीकडेच काहीजणांना काम केलं की, लगेच आमदारकीची स्वप्न पडु लागली आहेत. सुरवातीला स्थानिक संस्थांमधून आपण कामास सुरवात केली. पोल्ट्री, डेअरी शेती व्यवसाय केला. १९८८ साली ‘साहेब’ मुख्यमंत्री झाल्यावर त्याचा फायदा बारामतीला कसा होइल, ते पाहिलं. त्यानंतर कामे करत १९९१ ला खासदार झालो. मात्र, काही लोक काल काम नाही सुरु केलं, तोवरच त्यांना आमदाराकीची स्वप्न पडु लागली आहेत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना लगावला आहे.
बुधवारी (दि १३) ते लोणीभापकर येथे कोपरा सभेत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, मागे लोकसभेला लोकांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. पण ही निवडणुुक माझ्यासाठी महत्वाची आहे. राज्याच्या राजकारणात आठ दहा प्रमुख नावे घेतली जातात. त्यामध्ये उध्दव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस, अजित पवार अशी काही नावे आहेत. तिथं पोहोचायला काही वर्ष घासावी लागतात. एकदम माणूस निवडून आला की तिथपर्यंत पोहचू शकत नसल्याचे पवार म्हणाले.
मी सगळ्या समाज घटकाला उमेदवारी दिल्या आहेत. मी केवळ शिव शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन थांबत नाही. तर सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन चालतो. अल्पसंख्याक समाजाला १० टक्के जागा दिल्या आहेत. आदिवासी समाज आणि अनुसूचित जातीला साडे बारा टक्के जागा दिल्या आहेत. इतर कुठल्याही पक्षाने असे करण्याचा प्रयत्न केला नाही. धनगरांना तूर्तास एसटीमध्ये जागा देता येत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणासह विविध सवलती दिल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
आता ज्येष्ठांनी आशीर्वाद द्या
लोणीभापकर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर बसलेल्या बाबासाहेब नामे या ज्येष्ठ नागरिकाला वयाबाबत विचारणा केली. त्यावर नामे यांनी ८३ वर्ष वय सांगितल्यावर तुमची मुलेच सगळे काही बघत असतील, असे म्हणत ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले. पाहिजेत. ही जगाची रीत आहे, याचा अर्थ मी कोणाला देाष देतोय असा नव्हे, असे वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी या वक्तव्याद्वारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा अप्रत्यक्षरीत्या उपस्थित केला आहे. बाकीच्यांचे वय बघता पुढे बारामतीचे मलाच सगळं बघायचं आहे. मी जेवढे काम करू शकतो तेवढे महाराष्ट्रातील एकही आमदार काम करू शकत नाही,असे देखील उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
पुतण्या असलो तरी मुलासारखांच
काही वेगवेगळी लोक भेटतात. ‘सुप्रिया’च्या वेळी सांगायचे, ‘साहेबां’ ची शेवटची निवडणुक आहे लक्ष द्या.आता पण साहेबांची शेवटची निवडणुक आहे, नातवाकडे लक्ष द्या, असे सांगतात. पोरग सोडून नातवाचा प्रचार सुरु आहे. पुतण्या असलो तरी मुलासारखांच आहे. माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी विरोधी बाजुच्या पवार कुटुंबियांना उद्देशून केला आहे.